सर्जनशील लेखक राजन खान यांच्या हत्येची भीती - अभिजित झुंझारराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:26 AM2018-04-05T06:26:34+5:302018-04-05T06:26:34+5:30
सर्जनशील लेखक राजन खान यांच्या लिखाणात नाट्य दडलेले आहे. लिखाणामागील त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट आहे. त्यांचे सामाजिक कामही मोठे आहे. त्यांचे बेधडक व परखड विचार लोकांना पटतीलच असे नाही. त्यामुळे एखाद्या दिवशी खान यांची गोळ्या झाडून हत्या केली
कल्याण - सर्जनशील लेखक राजन खान यांच्या लिखाणात नाट्य दडलेले आहे. लिखाणामागील त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट आहे. त्यांचे सामाजिक कामही मोठे आहे. त्यांचे बेधडक व परखड विचार लोकांना पटतीलच असे नाही. त्यामुळे एखाद्या दिवशी खान यांची गोळ्या झाडून हत्या केली, अशी बातमी कानावर येऊ शकते, अशी भीती दिग्दर्शक व अभिनेता अभिजीत झुंझारराव यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कल्याण शाखेतर्फे नुकताच जागतिक रंगभूमी दिन स्वामी नारायण हॉल येथे साजरा झाला. ‘माकड’ या नाटकास अभूतपूर्व यश मिळाल्याबद्दल झुंझारराव यांचा सत्कार व मुलाखतीचा कार्यक्रम या वेळी झाला. याप्रसंगी समाजसेवक अकुंश केणे, महापौर राजेंद्र देवळेकर, संस्थेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, कोषाध्याक्ष विश्वनाथ गिरी, कार्यवाह रवींद्र सावंत, रंगकर्मी रवींद्र लाखे, ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे उपस्थित होते.
झुंझारराव म्हणाले, राजन खान हा एक वेडा माणूस आहे. मनुष्याकडे वेडेपणा नसेल तर माणूस जगू शकत नाही. आमचे विचार पटल्याने आम्ही एकत्र आलो. ज्या विचारवंतांचे विचार लोकांना पटले नाहीत, त्यांच्या हत्या झाल्या. त्यामुळे खान यांनाही धोका आहे, असे त्यांनी सांगितले.
नाटकाविषयी बोलताना ते म्हणाले, प्रत्येक प्रयोग करताना भीती असते. मुंबईत एकांकिका होतात. मात्र, कल्याणमध्ये त्या तुलनेत होत नाहीत. त्यामुळे कलावंत लोकांपर्यंत पोहोचत नाही. प्रामाणिकपणे काम केल्यास त्याची कधी ना कधी दखल घेतली जाईल. मला वडिलांकडून बाळकडू मिळाले. त्यामुळेच मी या क्षेत्रात इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. नाट्य क्षेत्रात जे काही समजत आहे, त्यामागे केवळ जयदेव हट्टगंडी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे काय करावे आणि करू नये, हे कळू लागले. २०१३ ला मी नोकरी सोडल्यानंतर नाट्य क्षेत्रात अधिक सक्रिय झालो. व्यावसायिक व प्रायोगिक नाटकात फरक करणे मला पसंत नाही. त्यांच्या जाहिरातीच्या दरातही फरक नसतो. मग आपण का, असा फरक करायचा. मी माझ्या नाटकांचा खर्च कसा कमी होईल, याकडे कटाक्षाने लक्ष देतो. लोक नाटक पाहायला फार कमी येतात, म्हणून नाट्य रंगभूमी मरणार नाही. मी माझ्या नाटकातून बॅक स्टेज ही संकल्पना काढून टाकली आहे. व्यावसायिक नाटक करताना निर्मात्यांना फायदा कसा होईल, हे देखील पाहावे लागते.
लाखे म्हणाले, कल्याणमध्ये रंगकर्मींना सोयी-सुविधा मिळत नाही. तालीम करण्यासाठी त्यांना जागा मिळावी, यासाठी महापौरांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. देवळेकर म्हणाले, ‘अत्रे रंगमंदिराच्या सिलिंगचे काम सध्या सुरू आहे. ते योग्यरितीने होणे गरजेचे आहे. अत्रे रंगमंदिर सुरू झाल्यावर तेथे तालीमांसाठी जागा देऊ. नाट्यकर्मींच्या प्रश्नांना प्राधन्य दिले जाईल. कल्याण-डोंबिवलीतील नाट्यगृहांचे व्यवस्थापन रंगकर्मींच्या हाती दिले आहे. नाट्यगृहांचे दर काय असावेत, यासाठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षांच्या उपस्थितीतच एक बैठक घेतली होती. त्यामुळे दर हे वाजवी आहेत. रंगकर्मींना जागा ही केवळ शिवाजी चौकातच हवी असते. ती तिथे देणे शक्य नाही. कलावंतांनीही थोडी तडजोड केली पाहिजे.’
हौशी नाट्यकर्मींसाठी मिनी थिएटर हवे : शिवाजी शिंदे म्हणाले, हौशी नाट्यकर्मींसाठी मिनी थिएटर असावे. त्यासाठी गुजराती शाळेच्या जागेचा विचार व्हावा. महापौर चषक सुरू करावा. त्यासाठी निधी देण्यासाठी नाट्यपरिषद पुढाकार घेईल. हौशी कलाकार हा राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊ शकतो. व्यवसायिक कलाकार जाऊ शकत नाही. त्यामुळे हौशी कलाकार हा जगला पाहिजे. कलाकरांनी आपला विमा उतरावावा, असे आवाहनही त्यांनी केले.
‘दोजख’मधील कलाकारांचा सत्कार : राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावणाºया अभिनय कल्याण प्रस्तुत ‘दोजख’ या नाटकातील रंगकर्मींचा तसेच ‘रिलेटिव्ह’ या नाटकाचे लेखक स्वप्नील चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.