भय येथे उरले नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 12:11 AM2020-11-16T00:11:32+5:302020-11-16T00:11:59+5:30
कल्याण-डोंबिवलीत फटाक्यांचा धूर
n प्रशांत माने
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रदूषणाचा धोका पाहता राज्य सरकारने केवळ लक्ष्मीपूजनाला लहान फटाके वाजवण्यास परवानगी दिली होती. मोठे फटाके वाजवू नका, असे आवाहनही केले होते. पण, या आवाहनाला कल्याण-डोंबिवलीत फारसा प्रतिसाद न मिळाल्याचे पाहायला मिळाले. फुलबाजांसह पाऊस आणि चक्र असे लहान फटाके उडवण्यासाेबतच बहुतांश भागांमध्ये सुतळीबॉम्बसह फटाक्यांच्या मोठ्या लवंगी माळांची आतषबाजी झाल्याचे दिसून आले.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ५२ हजारांच्या आसपास पोहाेचला आहे. तर, शनिवारपर्यंत एक हजार २७ जणांचा मृत्यू झाला होता. रुग्णसंख्या घटत असली, तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता खबरदारीचे आवाहन केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे नागरिकांना करत आहेत. प्रदूषणाची पातळी कायम राखण्यासाठी दिवाळीत फटाके मर्यादित स्वरूपात फोडण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशीच प्रदूषणाला कारणीभूत ठरणारी आतषबाजी झाल्याचे दिसले. कल्याण पूर्वेतील खडेगोळवली, काटेमानिवली, कोळसेवाडी, पुणे लिंक रोड तर पश्चिमेतील आधारवाडी, खडकपाडा, मुरबाड रोड, रामबाग, संतोषीमाता रोड, चिकणघर आणि डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा, मानपाडा रोड, गोग्रासवाडी, गांधीनगर, आयरे रोड, शेलार चौक, पश्चिम भागातील गरिबाचावाडा, गुप्ते रोड, महात्मा फुले रोड, दीनदयाळ रोड, उमेशनगर, मोठागाव ठाकुर्ली, कोपर, बावनचाळ या ठिकाणी शनिवारी संध्याकाळी सुतळीबॉम्ब, पाच ते १० हजारांच्या लवंगीच्या माळा, आकाशात जाऊन फुटणारे फटाके उडवून दिवाळीचा आनंद लुटण्यात आला.
निष्काळजीमुळे येणार काेराेनाची दुसरी लाट
ठाकुर्लीतही रेल्वे समांतर रस्ता असो अथवा ९० फूट रोड याठिकाणच्या गृहसंकुलांच्या परिसरात मोठ्या आवाजांचे फटाके सर्रास उडवले जात होते. यामुळे परिसरात धूरही झाला होता. नागरिकांचा हा निष्काळजीपणा कोरोनाची दुसरी लाट येण्यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी विजय भोसले यांनी दिली.