यंदा दुष्काळाची भीती; गुरांचा चारा जिल्ह्याबाहेर विकल्यास फाैजदारी कारवाई !
By सुरेश लोखंडे | Published: March 5, 2024 04:18 PM2024-03-05T16:18:12+5:302024-03-05T16:18:39+5:30
जिल्ह्यातील सर्व स्रोतापासून एक लाख १० हजार ५५५ मेट्रीक टन गुरांचा चारा उत्पादित होणार आहे.
ठाणे : दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल-निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती उद्भवण्याची भीती आहे. यास विचारात घेता ठाणे जिल्ह्यातील जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास वेळीच पायबंद घालण्यासाठी या वर्षातील खरीप पिक पेरणी, रब्बी पिक पेरणी, जंगल वनक्षेत्र, चराऊ क्षेत्र, झाडपाला, बांधावरील गवत आदी जनावरांच्या चाऱ्याची अन्य जिल्ह्यांत वाहतूक करण्यास मनाई आदेश ठाणे जिल्ह्याधिकारी अशोक शिनगारे यांनी जारी केला आहे. या आदेशाचे पालन न केल्यास फाैजदारी कारवाईचे संकेत आहेत.
जिल्ह्यातील सर्व स्रोतापासून एक लाख १० हजार ५५५ मेट्रीक टन गुरांचा चारा उत्पादित होणार आहे. जिल्ह्यातील पशुधनाला जूनपर्यंत एक लाख १९ हजार मे. टन चाऱ्याची गरज आहे. पाऊस उशिरा आल्यास जिल्ह्यात संभाव्य चारा टंचाई भासू शकते. त्यामुळे जिल्ह्यामध्ये उत्पादन होणाऱ्या गवतासह अन्य चारा तसेच मुरघास इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास बंदी आणण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्या बाहेरील खरेदीदारांना, निविदा धारकांना लिलाव देण्यात येऊ नये, असे आदेश जारी झाले आहे. संभाव्य आपत्ती कालावधीत जिल्ह्यात गुरांच्या चाऱ्याची टंचाई भासणार नाही आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकाराखाली जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास यांची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे.