लॉकडाऊनविरोधात उद्रेकाची भीती, साथरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याखेरीज मनमानी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 12:52 AM2020-07-18T00:52:37+5:302020-07-18T00:53:06+5:30
मार्च महिन्याच्या अखेरीस लागू केलेला लॉकडाऊन जून महिन्याच्या मध्यास संपला. त्यानंतर ‘पुनश्च हरिओम’चा गजर केला गेला.
ठाणे : जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांत जुलै महिन्याच्या २ व ३ तारखेपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला व त्याची मुदत रविवार १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आली. आता पुन्हा लॉकडाऊन वाढवला तर जनक्षोभाचा उद्रेक होण्याची भीती असून लोक अक्षरश: बिथरले आहेत. व्यापारी, उद्योजक, नोकरदार, विद्यार्थी, गृहिणी असे सारेच मनमानी पद्धतीने लादल्या जाणाऱ्या लॉकडाऊनवर कमालीचे नाराज झाले आहेत. लॉकडाऊन काळात कोरोना रुग्णसंख्या काही अंशी कमी झाली असली तरी अनेक शहरांतील मृत्युदर कायम आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील वेगवेगळ्या महापालिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखताना जनजीवन कसे सुरळीत होईल तेच पाहावे लागेल, असे वेगवेगळ्या समाजघटकांचे म्हणणे आहे.
मार्च महिन्याच्या अखेरीस लागू केलेला लॉकडाऊन जून महिन्याच्या मध्यास संपला. त्यानंतर ‘पुनश्च हरिओम’चा गजर केला गेला. लॉकडाऊन उठल्यावर लोक सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळतील, मास्क वापरतील हे पाहणे ही महापालिका व पोलीस प्रशासनाची जबाबदारी होती. मात्र लॉकडाऊनच्या ओझ्याखाली दबलेल्या प्रशासनाने सुटकेचा सुस्कारा सोडला तर नागरिकांना सर्व बंधनातून मुक्त झाल्याचा आनंद झाला. त्यामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. लागलीच राज्य सरकार व महापालिका प्रशासनाने कुठल्याही साथरोग तज्ज्ञांशी चर्चा न करता पुन्हा लॉकडाऊनचा सोपा मार्ग पत्करला. यामुळे काही शहरात रुग्णसंख्या काही अंशी कमी झाली, तर काही शहरात तेही साध्य झाले नाही. महत्त्वाचे म्हणजे एवढ्या प्रदीर्घ कालावधीसाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करुनही जिल्ह्यातील बहुतांश शहरातील मृत्युदर कायमच आहे. दुसरीकडे जनसामान्यांचे कंबरडे मोडल्याने लॉकडाऊनच्या नावाने सर्वत्र बोटं मोडली जात आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अस्वस्थ असलेल्या प्रशासनाने कडक लॉकडाऊन न केल्याने अपेक्षित रुग्णसंख्या कमी झाली नाही, असे सांगत महापालिका व पोलीस यंत्रणेला दोष देत आहेत, तर वारंवार लॉकडाऊन करुन प्रशासन व्यापारी, उद्योजक, नोकरदार, विद्यार्थी यांचे अतोनात आर्थिक, शैक्षणिक नुकसान करीत आहे. लॉकडाऊनमध्ये काळ्याबाजाराला ऊत येत असून अनेकांची उपासमार सुरु आहे. त्यामुळे यापुढे लॉकडाऊन वाढवल्यास
उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत आहे.
हे पर्याय कोरोना रोखतील?
लॉकडाऊन किंवा मर्र्यािदत वेळेत दुकाने उघडी ठेवली तर त्याच वेळेत लोक गर्दी करतात. त्यापेक्षा दिवसभर दुकाने उघडी ठेवली तर गर्दी विभागून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणार नाही.
मुख्य बाजारपेठा, मुख्य रस्ते येथील पोलीस व महापालिकेची गस्त वाढवली तर लोक सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करीत असल्यास त्यांना शिस्त लावणे शक्य होईल.
नियमभंग करणारी दुकाने, उद्योग किंवा नागरिक यांना मोठ्या रकमेचा दंड केला तर अगोदरच आर्थिक अडचणीत सापडलेला हा वर्ग त्यापेक्षा दुकान, कारखाना बंद ठेवतो. त्यामुळे व्यापारी, उद्योजक अथवा मास्क न घालणारे नागरिक यांना आपली चूक समजेल इतका किमान दंड केला तर इतरांना योग्य तो संदेश मिळेल.
शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवले आहेत. शिवाय पोलीस व महापालिका कर्मचारी यांची देखरेख वाढवली तर विनाकारण दुचाकी अथवा चारचाकी वाहने घेऊन फिरणाऱ्यांना आळा घालणे शक्य आहे.
मुंब्य्रात लॉकडाऊन धाब्यावर बसवून व्यवहार सुरु
मुंब्रा : ठाणे शहरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शहरात याविरोधात सूर उमटू लागले आहेत. मुंब्रा प्रभागामधील काही ठिकाणच्या व्यावसायिकांनी मागच्या दारातून दैनंदिन व्यवहार सुरू ठेवून लॉकडाऊन विरोधात पाऊल उचलले आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा फक्त फार्स सुरू आहे. मुंब्य्रातील काही बाजारपेठांमध्ये रस्त्यांवर भाजी तसेच फळ विक्रेते पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत विक्री करत आहेत. याचप्रमाणे येथील काही परिसरातील किराणा दुकानांप्रमाणेच सलून तसेच हॉटेल दिवसभर सुरू आहेत.तेथे मागच्या दारातून ग्राहकांना प्रवेश देण्यात येतो. ही बाब पोलीस तसेच ठामपा अधिकाºयांच्या लक्षात येऊ नये, यासाठी संबंधित व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनांबाहेर टेहळणी करण्यासाठी माणसं तैनात केली आहेत.
लॉकडाऊनविरोधात आंदोलनाचा भाजपचा इशारा
ठाणे : ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात सध्या लागू असलेल्या लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यास शुक्रवारी भाजपाने तीव्र विरोध दर्शविला. लॉकडाऊनबाबत नागरिकांमध्ये आक्र ोश आहे. त्यामुळे यापुढे लॉकडाऊन वाढविल्यास पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराच ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना दिलेल्या निवेदनामध्ये दिला. यासंदर्भात आयुक्तांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केल्याचे भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले. भाजपच्या शिष्टमंडळात आ. संजय केळकर, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले आणि नगरसेवक भरत चव्हाण आदींचा समावेश होता.
लॉकडाऊन, मिशन बिगिन अगेनसारखे प्रयत्न करुनही संसर्ग वाढतच आहे. त्यामुळे अनेक उद्योजक देशोधडीला लागत आहेत. दुकाने बंद ठेवल्याने त्यांच्या जागेचे भाडे, विविध कर, मोठी वीजबिले, पगार, स्थानिक कर अशा एक ना अनेक गोष्टींचा बोजा वाढत आहे. पुन्हा लॉकडाऊन न करता उद्योग चालू करण्याला परवानगी दिली जावी. लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध लादावेत. जे लोक अटीशर्तीचे पालन करत नाही, अशा लोकांना कठोर शिक्षा करावी. यासंदर्भातील पत्र पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाºयांनाही दिले आहे.
- अप्पासाहेब खांबेटे, अध्यक्ष, लघुउद्योजक संघटना, ठाणे
नागरिक आणि प्रशासनात समन्वयाऐवजी या तूट दिसते. लॉकडाऊनचा फारसा उपयोग झालेला नाही. ही दोन्ही चाके एकत्र चालणे आवश्यक आहे. स्थानिक नेत्यांसह प्रशासन आणि नागरिक यांचीही जबाबदारी आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवणे याला शास्त्रीय आधार आहे. पण तपासण्याही वाढविल्या पाहिजेत. क्वारंटाइन सेंटरचीही सुधारणा अपेक्षित आहे. लॉकडाऊनला पर्याय शोधणे ही काळाची गरज आहे.
- डॉ. महेश बेडेकर, सामाजिक कार्यकर्ते, ठाणे
लॉकडाऊन पुन्हा वाढवणे योग्य नाही. अनेक कामधंदे बंद आहेत. अनेक कामगारांना त्यांचे वेतनही मिळालेले नाही. त्यामुळे लाइट बिल, गॅस सोसायटी मेंटेनन्स असा सर्वच खर्च कसा भागवायचा, असे प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहेत. लॉकडाऊन केल्यानंतर सर्व सुविधा द्यायला हव्या. सर्व नागरिकांना रेशन आणि वीजपुरवठा, तसेच गॅस मोफत दिला तर काहीच समस्या उद्भवणार नाही.
- संतोष निकम, मनसे शाखाध्यक्ष, वर्तकनगर, ठाणे
लॉकडाऊन वाढवून फारसे साध्य झाले असे वाटत नाही. अत्यावश्यकच्या नावाखाली उलट अनेक ठिकाणी गर्दी होते. दूध, किराणा, भाजीपाला सुरळीत ठेवणे अपेक्षित आहे. जेव्हा बंद केले जाते, तेव्हा ते मिळविण्यासाठी आणखी गर्दी होते. मग सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाहीत. - संभाजी चव्हाण, अध्यक्ष, पंचवटी सोसायटी, वसंतविहार, ठाणे.