कारवाईच्या निषेधार्थ फेरीवाल्यांचा मोर्चा, 250 फेरीवाल्यांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 04:21 AM2018-08-28T04:21:45+5:302018-08-28T04:22:24+5:30
सतत २५ दिवस हटवले : हप्तेखोरीकरिता बडगा उगारल्याचा आरोप
भार्इंदर : मीरारोड येथील विजयपार्क, सिल्वरपार्क व ओम शांती चौकात गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे यांनी गेल्या २५ दिवसांपासून सतत कारवाई सुरू ठेवल्याच्या निषेधार्थ जनवादी हॉकर्स सभेच्या नेतृत्वाखाली सोमवारी फेरीवाल्यांनी पालिकेवर मोर्चा काढला.
विजयपार्क, सिल्वरपार्क व ओम शांती चौक परिसरात सुमारे २५० फेरीवाले गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत आहेत. फेरीवाल्यांचा व्यवसाय बेकायदेशीर असला तरी त्यांच्याकडून हप्ते गोळा करुन त्यांना बसवू देण्यात येत असल्याने फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फेरीवाल्याचा व्यवसाय करणाºयांचे पुनर्वसन होणे अपेक्षित होते. फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. त्यामुळे काही लोकप्रतिनिधी व अधिकाºयांचे हात ओले करुन हा व्यवसाय केला जात असल्याचा आरोप जनवादी हॉकर्स सभेचे मीरा-भार्इंदर अध्यक्ष अॅड. किशोर सामंत यांनी केला. फेरीवाल्यांकडे हप्ता वाढवण्याची मागणी अनेकदा केली जाते. ती पूर्ण न झाल्यास भ्रष्ट अधिकारी कारवाईचा बडगा उगारत असल्याचा आरोपही त्यांनी केला. फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवावी, त्यांचे परिसरातील जागेत पुनर्वसन करा, अशी मागणी करण्यात आली. फेरीवाल्यांवरील कारवाई व पुर्नवसनाची जबाबदारी शहर फेरीवाला समितीची असताना अधिकारी परस्पर कारवाई करुन फेरीवाला कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचा दावा त्यांनी केला.