...तर संपूर्ण ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 01:27 AM2019-08-01T01:27:20+5:302019-08-01T01:27:31+5:30

व्हॉल्व्हमनचे पगार रखडले : स्थायी समिती गठीत न झाल्याने अडचण

... fear of shutting down Thane city's water supply | ...तर संपूर्ण ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद होण्याची भीती

...तर संपूर्ण ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद होण्याची भीती

Next

ठाणे : स्थायी समिती गठीत न झाल्याचा मोठा फटका आता ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला बसण्याची शक्यता आहे. मुंब्य्रातील कंत्राटी स्वरूपातील व्हॉल्व्हमनचा दोन महिन्यांपासून पगारच झाला नसल्याचे समोर आले आहे. स्थायी समिती गठीत न झाल्याने त्यासंदर्भातील ठराव पालिका प्रशासनाकडे न आल्याने ही देणी देणे शक्य नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे. केवळ मुंब्राच नाही, तर शहरातील सर्वच प्रभाग समित्यांत हा प्रकार होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे हे कामगार काम सोडण्याच्या मन:स्थितीत असून, तसे झाल्यास ऐन पावसाळ्यात ठाणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

पाण्याचे नियोजन करण्यासाठी महापालिका हद्दीत वेगवेगळ्या वेळांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. त्यानुसार या प्रत्येक ठिकाणचे पाण्याचे व्हॉल्व्ह सुरू करण्याचे काम महापालिकेने खाजगी ठेकेदाराला दिले आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा तसेच घोडबंदर भागातील जलवाहिन्यांवर एक हजारहून अधिक व्हॉल्व्ह बसवण्यात आले आहेत. ते ठरावीक वेळेत उघडून पुन्हा बंद करण्याचे काम या कंत्राटी कामगारांकडून केले जाते.

अनेक प्रस्तावांना मंजुरीची प्रतीक्षा
स्थायी समितीचे मागील वर्षभरापासून पुन्हा भिजत घोंगडे पडले आहे. स्थायी समिती गठीत न झाल्याने अनेक प्रस्ताव थेट महासभेत मंजुरीसाठी पाठवण्यात येत आहेत. त्यात स्थायी समिती गठीत न झाल्याने अर्थसंकल्पावरदेखील आता महासभेत चर्चा होत आहे. परंतु,आता याचा फटका महापालिकेच्या विविध कामांनादेखील कसा बसू लागला आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी नियोजनासाठी प्रशासनाकडून दरवर्षी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात येते. यंदाही प्रशासनाने त्यासंबंधीचे प्रस्ताव तयार केले आहेत. मात्र, स्थायी समिती गठीत झालेली नसल्यामुळे ते मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडून पडू नये आणि शहराचा पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू राहावा, यासाठी प्रशासन जुन्याच ठेकेदारांकडून काम करून घेत आहे.

स्थायी समिती गठीत होत नसल्यामुळे नवीन ठेकेदाराची नियुक्ती रखडली असून यामुळेच कंत्राटी कामगारांचे पगार होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता अर्जुन अहिरे यांच्याशी संपर्कसाधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

Web Title: ... fear of shutting down Thane city's water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे