ठाणे काँलेजचे लाखोंच्या किमतीचे बेंच पावसात भिजून खराब होण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 07:38 PM2020-06-11T19:38:42+5:302020-06-11T19:39:59+5:30
लाखो रुपये किंमतीचे शेकडो बेंचेस इमारतीच्या गच्चीवर हमालांतर्फे अस्तव्यस्त ठेवले आहेत. या दरम्यान बहुतांशी तुटले आहेत. छत असलेल्या गच्चीवर चौबाजूंनी पावसाचे पाणी शिरुन बेंचेस खराब होण्याची भीती, या कालेजचे प्राध्यापक बिपीन धुमाळे यांनी व्यक्त केली आहे.
ठाणे : विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी विद्या प्रसारक मंडळाचे ठाणे कॉलेज प्रशासनाने जबरदस्ती ताब्यात घेतले आहे. त्यातील लाखो रुपये किंमतीचे शेकडो बेंचेस इमारतीच्या गच्चीवर हमालांतर्फे अस्तव्यस्त ठेवले आहेत. या दरम्यान बहुतांशी तुटले आहेत. छत असलेल्या गच्चीवर चौबाजूंनी पावसाचे पाणी शिरुन बेंचेस खराब होण्याची भीती, या कालेजचे प्राध्यापक बिपीन धुमाळे यांनी व्यक्त केली आहे.
शेकड्यांनी बेंचेस ठेवलेल्या गच्चीवर छप्पर आहे. पण गच्ची दोन्ही बाजूंनी उघडी आहे. एक मोठा पाऊस बेंचेस भिजवून टाकणार आहे. या बेंचेसची किंमत लाखो रुपये आहे. बेंचेस तुटायलाही लागले आहेत. रस्त्यावरची भेळेची गाडी ताब्यात घेतात तसे महाविद्यालय ताब्यात घेण्यात आले आहे. शैक्षणिक संस्था ताब्यात घ्या म्हणून आदेश देणाऱ्या या नोकरशहा विरोधात हा एका शैक्षणिक संस्थेचा आक्रोश असल्याचे धुमाळे यांनी लोकमतला सांगितले. या सत्तालोलुप अधिकारशाहीची ही मिजास सर्वथा चुकीची असल्याचे ही ते कळकळीने सांगतात.
विद्या प्रसारक मंडळाचा परिसर हा "ज्ञानद्वीप " नावाने प्रसिद्ध आहे. ठाण्याचे सांस्कृतिक संचित या संस्थेने घडवले आहे. साधारणतः 15 हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. त्यांच्या निकालाचे काम सुरू असताना अचानक अशी कार्यवाही प्रशासनाने करावयास नको होती. डॉ. बेडेकरांची व त्यांच्या कुटुंबाची सामाजिक बांधीलकी संपूर्ण ठाण्यातील जनता जाणते. त्यांनी उभं केलेलं हे शैक्षणिक संकुल संस्कार व मूल्यशिक्षणाचे मानबिंदू आहे. मात्र याचा कुठलाही विचार न करता अधिकारांचा गैरवापर करून तारतम्य विहीन वागणुकीचा निषेध केला गेला पाहिजे, असे ही ते संतापून सांगत आहेत.
इतिहासाच्या पुस्तकात प्लेगची साथ व इंग्रजी सोजिरांची जुलमी वागणूक वाचली होती. तीच मिजास जर आपल्या प्रशासनात बसलेल्या लोकांची असेल तर शिक्षणाचे व शिक्षण संस्थाचे पावित्र्य टिकणार नाही. 'विद्या ददाति विनयं" असं लहानपणी वाचलं होते. विद्या विनय देते म्हणे, मात्र विद्यासंपन्न, धनसंपन्न व अधिकार संपन्न व्यक्तींनी आपल्याच पुढच्या पिढीची आधुनिक तीर्थक्षेत्रे असलेल्या शिक्षण संस्थांची काळजी मोठ्या विनयाने घ्यावी ही सामान्य नागरिकांची इच्छा असते. या मूलभूत जीवन मूल्यालाच पायदळी तुडवले जात असेल तर भविष्य खूप चांगले आहे, असे म्हणता येणार नाही, असे याच जोशी बेडेकर महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डाळ. प्रशांत धर्माधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.