मनात धाकधुक अन् सेलिब्रेशन मूडही, अग्नितांडवानंतरही ठाणेकर सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 07:51 AM2017-12-31T07:51:07+5:302017-12-31T07:51:18+5:30

मुंबईतील कमला मिल कम्पाउंडमधील आगीच्या भीषण घटनेनंतरही ठाणेकरांचा हॉटेल, पबमध्ये जाऊन थर्टी फर्स्ट साजरा करण्याचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. अर्थात, अनेक हॉटेलांमध्ये बेकायदा पोटमाळे, बंद केलेले टेरेस येथे सेलिब्रेशन होणार असल्याने त्या ठिकाणी बसून पार्टी करताना मनात धाकधुक तर राहणारच, अशी भावना ठाणेकरांनी व्यक्त केली.

 Fearful and celebratory moods in the heart, even after burning fire, Thanekar is ready | मनात धाकधुक अन् सेलिब्रेशन मूडही, अग्नितांडवानंतरही ठाणेकर सज्ज

मनात धाकधुक अन् सेलिब्रेशन मूडही, अग्नितांडवानंतरही ठाणेकर सज्ज

Next

ठाणे : मुंबईतील कमला मिल कम्पाउंडमधील आगीच्या भीषण घटनेनंतरही ठाणेकरांचा हॉटेल, पबमध्ये जाऊन थर्टी फर्स्ट साजरा करण्याचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. अर्थात, अनेक हॉटेलांमध्ये बेकायदा पोटमाळे, बंद केलेले टेरेस येथे सेलिब्रेशन होणार असल्याने त्या ठिकाणी बसून पार्टी करताना मनात धाकधुक तर राहणारच, अशी भावना ठाणेकरांनी व्यक्त केली. मुंबईतील आगीची घटना हुक्का पार्लरमधील विस्तवाची ठिणगी उडाल्याने घडल्याचा अंदाज असल्याने ठाण्यातील हुक्का पार्लरवर शनिवारी पोलिसांनी कारवाई केली.
प्रस्तुत प्रतिनिधीने ठाण्यातील काही हॉटेल्स, पब यांना भेट दिली असला, ती नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत. कमला मिलमधील आगीच्या घटनेनंतर आम्हीही काळजी घेत असल्याचे हॉटेलमालक व व्यवस्थापक यांनी सांगितले. तसेच अग्निशमन दल, राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस दल आदी शासकीय यंत्रणांक डूनही डोळ्यांत तेल घालून आयोजन होणाºया ठिकाणांची कसून तपासणी केली जात आहे. सेलिब्रेशनसाठी हॉटेल्सनी बुकिंग घेतलेली नसल्याने ती रद्द केल्याचा प्रश्न नाही. मात्र, हॉटेल्स, पब येथे येणारे ग्राहक तसेच कर्मचाºयांच्या मनात धाक धुक आहे.
कमला मिलमधील ट्रेड हाउस या इमारतीमधील पब व रेस्टॉरंटमध्ये आग लागून जीवितहानी झाली. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांची शनिवारी बैठक बोलावली व सुरक्षिततेसंदर्भात सूचना केल्या. ३१ डिसेंबर रोजी रात्री होणाºया एक दिवसाच्या सेलिब्रेशनसाठी अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्या ठिकाणी सुरक्षिततेसंदर्भात कशा प्रकारे खबरदारी घेतली आहे, याची पाहणी करण्याचे आदेश दिले असल्याने अग्निशमन दलापासून पोलिसांपर्यंत आणि उत्पादन शुल्क विभागापासून आरोग्य विभागापर्यंत अनेक विभागांनी पाहणी केली. सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या.
ठाण्यात टेरेस हॉटेल्सची संख्या कमी आहे. तसेच ठाण्यात पब असले तरी त्यांची संख्या मर्यादित असून मुंबईच्या तुलनेत आकाराला छोटे आहेत. त्यामुळे त्याला पब नव्हे, तर लॉन असेच म्हटले जाते. ज्या हॉटेल्स व पबना भेट दिली, त्यांच्याकडे अग्निरोधक यंत्रणेबरोबर सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेतल्याचे दिसून आले. ठाण्यात अगोदर बुकिंग करून हॉटेल, पबमध्ये जाण्याचे कल्चर नाही. मात्र, ठाणेकरांच्या उत्साहावर आगीच्या घटनेने विरजण पडणार नाही, असा हॉटेल व पबमालकांना विश्वास वाटतो. तेथील ग्राहक व कर्मचाºयांकडे कालच्या आगीच्या दुर्घटनेचा विषय काढला असता, त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची शक्यता, तर कुठेही असते. त्यामुळे कुठेच जायचे नाही, असे ठरवावे लागेल. घरातही अशी आगीची घटना घडू शकते. अर्थात, जेथे अतिक्रमण केलेले आहे, जेथे ज्वलनशील पदार्थांचा वापर करून सजावट केलेली आहे, अशा हॉटेल, पबमध्ये पार्टी करताना मनाच्या कोपºयात धाकधुक राहणारच.

विशेष काळजी
गर्दीच्या ठिकाणी असलेली रोषणाई व रात्री होणारी फटाक्यांची आतषबाजी पाहण्याकरिता मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर येतील. त्या वेळी महिलांच्या छेडछाडीच्या घटना होऊ नये, याकरिता विशेष शाखा, गुन्हे शाखा, पोलीस स्टेशन यांचे साध्या वेशातील पोलीस बंदोबस्ताकरिता तैनात करण्यात आले आहेत. घातपाताचे प्रकार होऊ नये, याकरिता डॉग स्क्वॉड व अ‍ॅण्टी सॅबोटेज स्क्वॉडचे चेकिंग असणार आहे. अचानक धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हबाबत विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचबरोबर मालमत्तेचे नुकसान व मारहाण असे गुन्हे घडू नये, याकरिता पायी पेट्रोलिंग तसेच मोबाइल पेट्रोलिंग स्क्वॉड तैनात केले आहेत. ठिकठिकाणी सायंकाळपासून नाकाबंदीही केली जाणार असल्याने वाहतुकीची गती धीमी होणार आहे.

पार्ट्यांच्या ठिकाणांवर नजर
ठाणे येथे तलावपाळी, येऊर हिल्स, उपवन व दुर्गाडी या ठिकाणी तसेच विविध हॉटेल्स, खाडीकिनारे, ढाबे, उद्यान व निसर्गरम्य ठिकाणे येथे होणाºया पार्ट्यांवर पोलिसांची बारीक नजर असून त्या परिसरात विशेष बंदोबस्त ठेवला आहे.

असा आहे बंदोबस्त : नववर्ष स्वागताच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ५५० पोलीस अधिकारी व सहा हजार पोलीस कर्मचाºयांचा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच वाहतूक शाखेकडून महत्त्वाच्या चौकात ८० पोलीस अधिकारी व ४५० पोलीस कर्मचारी तैनात केलेले आहेत.

‘आॅल इज वेल’चा संदेश दरतासाला : ठाण्यातील हॉटेल्स, पब, मॉल आणि थिएटर येथील व्यवस्थापकांनी अग्निशमन विभागाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाºयांना दरतासाने ‘आॅल इज वेल’, असा संदेश देणे बंधनकारक केले आहे.

हुक्का पार्लरवर महापालिकेची कारवाई
प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, अपुरी अग्निसुरक्षा असल्यामुळे अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन व महापालिका अतिक्रमण विभागामार्फत ब्रह्मांड येथील हॉटेल तुलसीवर कारवाई करण्यात आली. हॉटेल लेरिडाच्या टेरेसवरील बेकायदा हुक्का पार्लर पाडण्याची कारवाई केली.

सहा तात्पुरती अग्निशमन केंद्रे
आगीच्या घटनांवर तत्काळ नियंत्रण आणण्याकरिता ठाण्यातील ओवळा, टिकुजिनीवाडी, लोकमान्यनगर बसडेपो, रेमण्ड, कळव्यातील मनीषानगर आणि दिवा येथे २४ तासांच्या कालावधीकरिता तात्पुरती अग्निशमन केंद्रे सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. येथे एक फायर इंजीन आणि सहा ते सात कर्मचारी तैनात असतील.

महापालिकेच्या ठळक सूचना
१) स्मोकिंग झोन वेगळ्या ठिकाणी दूरवर असावा
२) जेथे ग्राहकांची गर्दी होणार आहे, तेथे दारूचा मर्यादित साठा करावा.
३) हॉटेलच्या स्वयंपाकघरात एकाच प्रकारचे इंधन वापरावे.
४) हॉटेलमध्ये रसायने व तत्सम ज्वलनशील पदार्थांचा साठा करू नये.
५) प्रवेशद्वार व बाहेर पडण्याचा मार्ग येथे अडथळे ठेवू नये.

मी पबमध्ये जाते. मात्र, परवाच्या दुर्घटनेनंतर भीती वाटते. त्यामुळे यंदा तरी आम्ही साधारण हॉटेलमध्ये थर्टी फर्स्ट साजरा करण्याच्या विचारात आहोत.
- रूबी धेडिया

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन एका पबमध्ये करणार होतो. मात्र, त्या दिवशीच्या दुर्घटनेनंतर धाकधुक वाटते. तूर्तास आम्ही पबमध्ये सेलिब्रेशन करण्याचा बेत रद्द केला आहे.
- अक्षय राऊळ

आमच्या ग्रुपचा प्लान होता, एखाद्या हुक्का पार्लरमध्ये जाण्याकरिता बुकिंग करायचे. मात्र, आता अशा छोट्या हुक्का पार्लर किंवा पबमध्ये जाणे धोकादायक वाटते. सध्या तरी कोणत्याच हॉटेल, हुक्का पार्लरमध्ये जाण्याचा विचार नाही.
- सार्थक पारोल

थर्टी फर्स्टसाठी नाही, परंतु काही स्पेशल पार्टीसाठी आम्ही पबमध्ये जात असतो. मात्र, परवाची दुर्घटना भीषण होती. पब, पार्लरच्या ठिकाणी असे काही होऊ शकते, याची कल्पनाही करू शकत नाही. आता पबमध्ये जाण्याची भीती वाटते. - मानव मेहता

कमला मिल दुर्घटना भीषण होती. तेथील पब, पार्लर बेकायदेशीर होते का, हा एक प्रश्न आहे. मात्र, पबमध्ये जाताना तो कोठे,
केवढ्या जागेत आहे, हे पाहणे गरजेचे आहे. आपत्कालीन सोयी असलेल्या पबमध्ये जाण्यास हरकत नाही. मात्र, सध्या थर्टी फर्स्ट कोणत्याही पब, पार्लरमध्ये साजरा करणार नाही.
- मनीष एम.

न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी आमची पहिली पसंती पार्लरला असते. मात्र, यंदा अद्याप आम्ही बुकिंग केलेले नाही आणि पबमध्ये जायला भीती वाटत असल्याने करणारही नाही.
- दक्षा राठोड

पालकांच्या प्रतिक्रिया
मुले एन्जॉयमेंट म्हणून पबमध्ये जातात. पण, तिथे आगीचे असे भीषण तांडव होऊ शकते, हा विचार करवत नाही. तरुणाईने अशा बेकायदा पब, पार्लरमध्ये जाणे टाळले पाहिजे.
- दिनेश गिरी

मित्रमैत्रिणींसोबत एन्जॉय करायला म्हणून पब, पार्लरमध्ये जाणाºया तरुणांची संख्या कमी नाही. परंतु, मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तिथे उपाययोजना नसावी, हे धक्कादायक आहे. अशा ठिकाणी जाणे बंद करून तरुणांनी या पबमालकांचा धंदाच बंद पाडला पाहिजे. अशा छोट्याछोट्या जागांमध्ये पबला परवानगी मिळतेच कशी, हासुद्धा एक प्रश्न आहे.
- राहुल माळोदे

माझी मुलं बर्थडे पार्टी किंवा काही निमित्ताने होणाºया पार्ट्यांसाठी जातात. मात्र, मुलांच्या हे जीवावर बेतू शकते. परवा अशीच बर्थ डे पार्टी त्या पबमध्ये झाल्याचा व्हिडीओ फिरतो आहे. आता मुलांना अशा पब, पार्लरमध्ये पाठवायला भीती वाटते. थर्टी फर्स्टला मुलांना तिथे जाणे नाकारले आहे.
- सी.पी. देशपांडे

Web Title:  Fearful and celebratory moods in the heart, even after burning fire, Thanekar is ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.