कोरोना संसर्गाच्या भीतीने उल्हासनगर मराठा सेक्शन येथील अवैध भाजी मार्केट हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 05:26 PM2020-09-18T17:26:16+5:302020-09-18T17:26:54+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील मुख्य मार्केट परिसरात महापालिका भाजी मंडई असताना, भाजी विक्रेते रस्त्यावर बसायचे. या विरोधात स्थानिक व्यापाऱ्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले.
उल्हासनगर : मराठा सेक्शन जिजामाता गार्डन येथील अवैध भाजी मार्केटवर अतिक्रमण विभागाने गुरवारी कारवाई केली. या कारवाईने भाजी विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून ऐण कोरोना काळात भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ महापालिकेने आणल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील मुख्य मार्केट परिसरात महापालिका भाजी मंडई असताना, भाजी विक्रेते रस्त्यावर बसायचे. या विरोधात स्थानिक व्यापाऱ्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले. त्यानंतर रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांवर पालिकेने कारवाई केली होती. त्यातील काही व्यापाऱ्यांनी भाजी मंडईत ग्राहक येत नसल्याचे कारण सांगत मराठा सेक्शन जिजामाता गार्डन शेजारील रस्त्यावर बस्थान मांडले. अवैध भाजी मंडईला राजकीय आश्रय मिळताच भाजी मार्केट जोरात सुरू झाले. भाजी मंडईत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी गर्दी केल्याने वाहतूक कोंडी झाली. तसेच कोरोना संसर्गाची भीती वाढली होती. दरम्यान महापालिकेने कोरोना महामारी वेळी भाजी विक्रेत्यांनी भाजी विकण्यास परवानगी दिल्याने अवैधपणे भाजी मार्केट सुरू होते.
देशासह राज्यात व शहरात कोरोना रुग्णाच्या संकेत वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून महापालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने मराठा सेक्शन जिजामाता गार्डन जवळील भाजी मार्केटवर कारवाई केली. २५ पेक्षा जास्त भाजी विक्रेत्यांचे गाळे जमीनदोस्त केले. भाजी मार्केट मध्ये महापालिकेने घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन होऊन कोरोना संसर्ग वाढल्याची माहिती शिंपी यांनी दिली. तर भाजी विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त करीत कुटुंबावर उपासमारीची वेळ zयेणार असल्याची प्रतिक्रिया दिली. महापालिका जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी अवैधपणे सुरू असलेल्या भाजी मंडई पासून कोरोना रुग्णांचा संसर्ग होऊ नये म्हणून अतिक्रमण विभागाने कारवाई केल्याची माहिती पत्रकारांना दिली.
शहरातील फिरते भाजी विक्रेते टार्गेटवर
शहरात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असून कोरोनचा प्रादुर्भाव करण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना राबवित आहेत. यातूनच मराठा सेक्शन येथील भाजी मार्केटवर कारवाई झाली. शहरात फिरत्या भाजी विक्रेत्याचे प्रमाण मोठे असून ते महापालिकेच्या रडारवर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.