पिण्याच्या पाण्यात आढळली पिसे; आसनगावमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 12:34 AM2019-07-22T00:34:11+5:302019-07-22T00:34:25+5:30
या घटनेमुळे संपूर्ण आसनगावकर नागरिक भयभीत झाले असून या प्रकाराबाबत संताप व्यक्त करत आहेत.
आसनगाव : गेल्या अनेक दिवसांपासून आसनगाव शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असतानाच शनिवारी रात्री येथील संभाजीनगर विभागात सोडण्यात आलेल्या नळाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात पिसे आढळून आल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहापूर तालुक्यातील आसनगाव ग्रामपंचायत हद्दीत सातत्याने पंप जळणे, कर्मचारी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष, पाण्याचे प्रभागानुसार असमान वितरण, बेकायदा नळजोडण्या अशा अनेक कारणांमुळे सातत्याने आसनगाव शहराला पाण्याची टंचाई निर्माण होत असल्यामुळे येथील नागरिक ग्रामपंचायतीच्या काराभारामुळे त्रस्त झाले आहेत. नागरिकांना पंधरापंधरा दिवस पाणी मिळत नसताना शनिवारी रात्री संभाजीनगर परिसरात पिण्याचे पाणी आले, तेव्हा चांग्याचापाडा येथील रहिवासी दुधाळे, पाटील, पेटकर, देसले, पारधी आणि खान यांच्या घरातील पाण्यात मोठ्या प्रमाणात पिसे आढळून आली. या घटनेमुळे संपूर्ण आसनगावकर नागरिक भयभीत झाले असून या प्रकाराबाबत संताप व्यक्त करत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आसनगाव शहराध्यक्ष अविनाश चंदे यांनी या गंभीर घटनेची दखल घेतली असून या पाण्याचे परीक्षण करून या घटनेची सविस्तर चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे. या भागातील नागरिकांना हे पाणी न पिण्याचे आवाहन केले आहे.