मध्यवर्ती रुग्णालयात बाळाला डॉक्टरकडून फिडिंग; डॉक्टरांचे सर्व स्तरातून कौतुक
By सदानंद नाईक | Published: December 17, 2023 09:18 PM2023-12-17T21:18:37+5:302023-12-17T21:19:05+5:30
बाळाची आई मनोरुग्ण असल्याने डॉक्टरांचा निर्णय
सदानंद नाईक, उल्हासनगर: मध्यवर्ती रुग्णालयात मनोरुग्ण असलेल्या महिलेच्या बाळाला डॉक्टरांनी फिडिंग केल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेने डॉक्टरांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी रुग्णालयात रुग्णासाठी असे विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती दिली.
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाने कमी दिवसाच्या व अवघ्या अर्धा किलो वजनाच्या मुलाला उपचार करून जीवदान दिले. तसेच एका महिलेच्या पोटातून अर्धा किलोचा गोळा काढल्याची घटना गेल्या महिन्यात उघड झाल्या आहेत. याच बरोबर रुग्णालयात विविध उपक्रम राबवित असल्याने, उपचारासाठी येत असलेल्या रुग्णांना मध्यवर्ती रुग्णालयात आपलेसे वाटू लागले. १२ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजता एका महिलेने दिड किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला. मात्र आई मनोरुग्ण असल्याने, बाळाला फिडिंग करण्यात अडचण येऊ लागली. तसेच डॉक्टरांना याबाबत चिंता वाटू लागली. सदर बाळ इनकुबिटर मध्ये ठेवले असून त्याला फिडींग करावे लागते. परंतु आई मनोरुग्ण असल्याने त्या बालकास फिडींग करू शकत नाही. अशावेळी रुग्णालयचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे व अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ वसंतराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एसएनसीयु कक्षात बाळाला अन्य डॉक्टरांच्या मदतीने फिडिंग करण्याचा निर्णय घेतला.
मध्यवर्ती रुग्णालयाच्या एसएनसीयु कक्षात वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण यांनी पुढाकार घेऊन स्वतः आपल्या हाताने या बालकास फिडींग केले. तसेच उपचार सुरू केल्याने, रडणारे बाळ शांत होऊन मायेची ऊब मिळाली. डॉक्टरांच्या या उपक्रमाची माहिती रुग्णालयात झाल्यावर डॉक्टरांवर रुग्णालयावर शुभेच्छाचा वर्षाव सर्वच स्तरातून होत आहे. याबाबत रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी रुग्णाला सर्वोत्तम उपचार मिळून ते बरे व्हावे. अशी भूमिका असते. यातूनच बाळाला डॉक्टरांनी फिडिंग केल्याचे सांगितले.