शाळेतील इतर उपक्रमांच्या फी आकारू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:50 AM2021-06-09T04:50:07+5:302021-06-09T04:50:07+5:30
चार दिवसांपूर्वी अंबरनाथ येथील गुरुकुल ग्रँड शाळेमध्ये फीवरून पालक आणि शाळा प्रशासनात वाद झाला होता. त्यानंतर इतर शाळांनी अशाच ...
चार दिवसांपूर्वी अंबरनाथ येथील गुरुकुल ग्रँड शाळेमध्ये फीवरून पालक आणि शाळा प्रशासनात वाद झाला होता. त्यानंतर इतर शाळांनी अशाच प्रकारे अतिरिक्त फी आकारल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पालकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता आमदार किणीकर यांनी शाळा प्रशासन शिक्षण विभागाचे अधिकारी आणि पालक यांची एकत्रित बैठक आयोजित केली होती. लॉकडाऊनच्या काळात शाळा सुरू नसतानाही प्रत्येक शाळेने आहे ती फी आकारून पालकांना वेठीस धरण्याचे काम केले आहे. शाळेत कोणतेही उपक्रम झालेले नसताना त्या उपक्रमांचीदेखील फी आकारण्यात आली आहे. ग्रंथालय किंवा सांस्कृतिक कार्यक्रमदेखील झालेले नसताना त्या कार्यक्रमांचीही वाढीव रक्कम आकारली जात असल्याचा आरोप पालकांनी केला. अनेक शाळांनी ऑनलाईन क्लासेस न घेता विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. काही शाळांनी केवळ विद्यार्थ्यांना कोणता अभ्यास करायचा आहे, हे सांगून आपली जबाबदारी झटकली होती. असे असतानाही शाळा पालकांकडून पूर्ण फी वसूल करीत आहेत. किणीकर यांनी उपस्थित सर्व शाळा आणि पालकांची बाजू ऐकून घेत त्यावर तोडगा काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. या बैठकीनंतर शाळा प्रशासन आणि पालकांमधील वाद कमी होण्यास मदत होईल, असे मत किणीकर यांनी व्यक्त केले.