ठाण्याच्या रुग्णालयात महिला डॉक्टरला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 05:48 AM2019-09-21T05:48:05+5:302019-09-21T05:48:09+5:30
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या रिंकू यादवने शुक्रवारी सकाळी रुग्णालयातील निवासी डॉक्टर धनश्री केळकर यांना मारहाण केली.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या रिंकू यादवने शुक्रवारी सकाळी रुग्णालयातील निवासी डॉक्टर धनश्री केळकर यांना मारहाण केली. याप्रकरणी रिंकूविरोधात गुन्हा दाखल झाला. रिंकूच्या हाताला आयव्ही लावली असताना, ती काढून रिंकू वॉर्डमधून सारखी बाहेर येजा करत होती. डॉक्टर केळकर यांनी बाहेर जाऊ नको, असे तिला म्हटले. त्याचा राग मनात धरून आणि प्रसूतिकळांच्या त्रासातून तिने केळकर यांना मारहाण केली. मारहाणीत त्यांच्या नाकाला आणि डोक्याला दुखापत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रसूतिवेदना सुरू झाल्याने तिला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करून आयव्ही लावले होते. मात्र, प्रसूतिवेदना होत असल्याने तिची चिडचिड वाढली होती. अशातच, ती आयव्हीची सुई काढून बाहेर येजा करत होती. त्यावेळी त्या वॉर्डमध्ये निवासी डॉक्टर धनश्री केळकर इतर रुग्णांची तपासणी करत होत्या. त्यांनी तू बाहेर जाऊ नकोस. आपण तुझी तपासणी करून पुढे निर्णय घेऊ, असे त्यांनी तिला सांगितले. त्यावेळी वेदनांनी त्रासलेल्या रिंकूने केळकर यांना लाथ मारल्याने तेथील बेसीन त्यांच्या डोक्याला लागले. तसेच रक्तदाब तपासणी करण्याची मशीन नाकाला लागल्याने त्या जखमी झाल्या. या घटनेनंतर रिंकू पळून जाण्याच्या तयारीत होती. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिची समजूत काढून तिच्यावर उपचार सुरू ठेवल्याचे कळवा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. अशा घटना यापुढे घडू नये, यासाठी रुग्णालय प्रशासनाने वॉर्डमध्ये महिला सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. केळकर यांच्या तक्रारीनुसार रिंकूविरोधात गुन्हा दाखल झाला.
>प्रसूतिकक्षात महिला सुरक्षारक्षक नेमणार
ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेनंतरही रुग्ण रिंकूची काळजी घेतली जात आहे. जखमी डॉक्टर केळकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा प्रकार प्रसूतिकळांमुळे रुग्णाला चिडचिड झाल्याने घडला असावा. अशा घटना भविष्यात होऊ नये, यासाठी प्रसूतिकक्षात एक महिला सुरक्षारक्षक ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- संध्या खडसे, अधिष्ठाता, छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा
>या घटनेनंतर डॉक्टर केळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण करणे, यासारख्या कलमान्वये रिंकू यादव हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टर केळकरांच्या नाकाला आणि डोक्याला दुखापत झाली आहे.
- शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळवा पोलीस ठाणे