महिला पोलिसाला महिलेची मारहाण
By admin | Published: September 29, 2016 03:49 AM2016-09-29T03:49:38+5:302016-09-29T03:49:38+5:30
कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन डगळे यांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका महिलेने महिला पोलिसाला
कल्याण : कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन डगळे यांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका महिलेने महिला पोलिसाला मारहाण तसेच शिवीगाळ करत धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात घडला. याप्रकरणी त्या महिलेवर गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.
हीना अन्सारी (रा. रहेजा कॉम्प्लेक्स, पत्रीपूल) असे या महिलेचे नाव आहे. ती वडील अताउल्लाह अन्सारी यांच्यासमवेत राहते. रहेजा कॉम्प्लेक्समधील त्यांच्या नावावर असलेला फ्लॅट विकण्यासाठी अताउल्लाह यांनी स्थानिक इस्टेट एजंट किरण दंडगव्हाळ यांच्यामार्फत मोहम्मद मुजावर यांच्याशी १० हजार रु पये टोकन घेत प्राथमिक व्यवहार केला होता. मात्र, हीनाने या व्यवहाराला विरोध करण्याबरोबरच मुजावर यांना वारंवार फोन करून घराचे कागद मागण्यास सुरु वात केली. हीनाच्या त्रासाला कंटाळून अखेर मुजावर यांनी व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, दंडगव्हाळ आणि मुजावर हे अताउल्लाह अन्सारी यांच्या घरी गेले असता हीनाने मुजावर यांना मारहाण तसेच आपल्यालाही शिवीगाळ केल्याचे दंडगव्हाळ यांनी सांगितले. याप्रकरणी एमएफसीचे व.पो.नि. अनिल पोवार यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
महिला पोलीस हवालदार सुमन वांगड यांनी हीनाला नेले असता तेथे हीनाने वांगड यांना मारहाण केली. तसेच पोलीस ठाण्यात जोरात आरडाओरडा करून शिवीगाळही केली. ‘माझी ओळख वरपर्यंत आहे, तुम्ही सर्वांनी बघा मी आता काय करते ते,’ अशी धमकीही तिने पोलिसांना दिली आहे.