नोकरीच्या आमिषाने मुलींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 11:47 PM2019-07-06T23:47:49+5:302019-07-06T23:47:53+5:30
अडीच हजार उकळले । सिंधुदुर्गमध्ये गुन्हा दाखल
ठाणे : कोकणातील मुलींना ठाण्यातील एका कॉलसेंटरमध्ये नोकरीस लावण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा प्रकार शुक्रवारी उघड झाला. त्यांना नोकरी देण्याऐवजी विविध ठिकाणी फिरवले जात होते. त्याची माहिती शिवसेनेच्या नगरसेवकांना मिळाल्यानंतर त्यांनी त्यांची गुरुवारी सुटका करून त्यांना एका खासगी बसने त्यांच्या गावी सुखरूप पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या १३ तरुणींकडून नोकरीसाठी प्रत्येकी अडीच हजार रु पये घेऊन एका संस्थेने त्यांना ठाण्यात आणले होते. त्यांना एका कॉलसेंटरमध्ये काम देण्याचे प्रलोभनही दाखवले होते. परंतु, ठाण्यात १ जुलै रोजी आणल्यानंतर रेल्वेस्थानक परिसरातील एका लॉजमध्ये त्यांना ठेवले होते. त्यानंतर, नोकरी देणे दूरच राहिले, त्यांच्या खाण्याचीही आबाळ केली जात होती. या लॉजनंतर त्यांना किसननगर येथील एका खोलीत आणून ठेवले. एकाच वेळी १३ मुलींना एका घरात आणून ठेवल्याबद्दल परिसरातील नागरिकांना संशय आला. त्यांनी याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक योगेश जानकर यांना दिली. त्यांनी थेट या मुलींना ठेवलेल्या खोलीकडे धाव घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना सोबतच्या दोन युवकांकडून विविध ठिकाणी फिरवले जात असल्याची माहिती त्यांना मिळाली.
यानंतर, या दोन युवकांना शिवसेना स्टाइलने समजावण्यात आले. त्यानंतर, या मुलींच्या पालकांशी दूरध्वनीवरून जानकर तसेच या मुलींनी संवाद साधला. या मुलींकडे घरी जाण्यासाठी तिकिटाचे पैसे नसल्याने जानकर यांनी खासगी बस उपलब्ध करून दिली. तसेच सिंधुदुर्ग येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधून या मुलींना फसवणाऱ्यांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. या दोघांविरोधात आता सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच त्यांना नोकरीची फूस लावणाºया एका महिलेचाही शोध घेतला जात आहे. याच महिलेने अशा प्रकारे आणखी काही मुलींची फसवणूक केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकाराने मुली राहत असलेल्या परिसरात खळबळ उडाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक प्रशिक्षण शिबिर होते. याच शिबिरामार्फत एका खासगी संस्थेतील दोघांनी या मुलींकडून नोकरीसाठी पैसे घेऊन ठाण्यात आणले. हा प्रकार संशयास्पद वाटल्यानंतर गुरुवारी या सर्व मुलींची किसननगरमधून सुटका केली.
- योगेश जानकर, नगरसेवक,
शिवसेना, ठाणे