भिवंडीत बंटी-बबलीने केली मुस्लिम बांधवांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 09:50 PM2018-10-23T21:50:06+5:302018-10-23T21:53:41+5:30
भिवंडी : शहरातील मुस्लिम बांधवांना ‘हलाल’च्या कमाईचे आकर्षण दाखवित कोट्यावधी रूपयांचा गंडा घालणाऱ्या बंटी-बबलीच्या विरोधात चौदा तक्रारदारांनी पोलीसांकडे तक्रार ...
भिवंडी: शहरातील मुस्लिम बांधवांना ‘हलाल’च्या कमाईचे आकर्षण दाखवित कोट्यावधी रूपयांचा गंडा घालणाऱ्या बंटी-बबलीच्या विरोधात चौदा तक्रारदारांनी पोलीसांकडे तक्रार केली असुन त्यामध्ये यंत्रमाग कामगार,कापडव्यापारी,डॉक्टर यांच्यासह अनेक मान्यवरांनी गुंतवणूक केल्याचे हळूहळू उघडकीस येत आहे.
धार्मिकदृष्ट्या मुस्लिम बांधवांना व्याज अथवा अन्य अवैध मार्गांनी मिळणारा पैसा वर्ज असल्याने त्यांना लाखो रूपयांच्या गुंतवणूकीच्या व्यवसायातून हलालची कमाई मिळेल,असे आमिष दाखवून हिरा गोल्ड एक्झिम लि.कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. सन २०१३मध्ये इम्रान शेख व नुहिरा शेख या हैद्राबाद मधील जोडप्याने शहरातील हनुमानबावडी समोरील मिरॅकल मॉलमध्ये हिरा गोल्ड एक्झिम कंपनीचे कार्यालय सुरू करून धर्मिक मानसिकतेतून प्रचार सुरू केला.त्यामुळे कंपनीच्या योजनेत शहरातील सुमारे अडीच ते तीन हजार मुस्लिम बांधवानी कोट्यावधी रूपयांची आर्थिक गुंतवणूक केली.त्यामध्ये कामगार,व्यापारी,डॉक्टर व मान्यवरांचा समावेश आहे. गेल्या सहा सात महिन्यापासून गुंतवणूकदारांना नियमीत व्याज न मिळाल्याने त्यांनी गुंतवलेली रक्कम परत मागण्याचा तगादा सुरू केला. परंतू इम्रान व नुहिरा हे दोघे त्यांना ‘तारीख पे तारीख’ देत पैसे देणे टाळू लागले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे समजल्याने गुंतवणूकदारांनी कंपनीच्या कार्यालयांत वाद घालण्यास सुरूवात केली. गुंतवणूक दारांच्या तक्रारीला सामोरा जाता येत नसल्याने इम्रान शेख व नुहिरा शेख या दोघांनी कार्यालय सोडून पळ काढला. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात भूसार मोहल्ल्यातील मोहम्मद अली इब्राहिम फकीह(३८)यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलीसांनी मिरॅकल मॉलमधील कंपनीच्या कार्यालयांस सील केले. तर सध्या १४ गुंतवणूक दारांनी केलेल्या तक्रारीनुसार १ कोटी २ लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील गुंतवणूकदारांना ही घटना समजल्यानंतर ते तक्रारीसाठी पोलीस ठाणे गाठत आहेत, त्यामुळे फसवणूक झालेल्या रक्कमेचा आकडा वाढणार आहे.या कंपनीने देशांतील विविध भागात मुस्लिम बांधवांना आकर्षित करण्यासाठी कार्यालये उघडून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची माहिती पोलीस सुत्राकडून मिळते.त्यामुळे शहरातील गुंतवणूक दारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.