उल्हासनगरमध्ये खतप्रक्रिया संथगतीने; दीड वर्षात २५ टक्केही काम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 01:00 AM2021-02-07T01:00:42+5:302021-02-07T01:00:57+5:30
उल्हासनगर महापालिकेच्या म्हारळ गावाशेजारील राणा डम्पिंग ग्राउंड ओव्हरफ्लो झाल्याने तेथे असलेल्या नागरी वस्तीला धोका निर्माण झाला आहे.
उल्हासनगर : महापालिकेच्या म्हारळ गावाशेजारील राणा डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रक्रिया गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. मात्र, प्रक्रियेचे काम संथगतीने होत असल्याने २५ टक्केही काम झालेले नाही.
उल्हासनगर महापालिकेच्या म्हारळ गावाशेजारील राणा डम्पिंग ग्राउंड ओव्हरफ्लो झाल्याने तेथे असलेल्या नागरी वस्तीला धोका निर्माण झाला आहे. डम्पिंगसाठी महापालिकेकडे पर्यायी जागा नसल्याने नाइलाजास्तव कॅम्प नं ५ येथील खडीखदाण येथील मोकळ्या जागेवर कचरा टाकण्यास सुरुवात केली. नागरिक व परिसरातील नगरसेवकांनी या डम्पिंगला विरोध करून उपोषण, धरणे आंदोलन, महासभेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन झाले. मात्र, डम्पिंगसाठी पर्यायी जागा नसल्याने, शहरातील कचरा खडीखदाण येथे टाकण्यात येतो. डम्पिंगचा भविष्यातील धोका ओळखून तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे, सुधाकर देशमुख यांनी राज्य सरकारला समस्यांची माहिती देऊन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पर्यायी जागेची मागणी केली. अखेर, सरकारने उसाटणे गावाच्या हद्दीतील एमएमआरडीएच्या ताब्यातील ३० एकर जागा महापालिकेला हस्तांतरित केली. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी याठिकाणी एक ते दोन वर्षांचा कालावधी जाणार आहे.
राणा डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्याची योजना राज्य सरकारच्या मदतीने महापालिकेने दीड वर्षांपासून सुरू केली. मात्र, २५ टक्केही काम पूर्ण झालेले नाही. इतर योजनेप्रमाणे याचा फज्जा उडणार असल्याचेही बोलले जात आहे. महापालिकेच्या सार्वजनिक विभागाचे आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य आरोग्य अधिकारी एकनाथ पवार यांनी डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावर प्रक्रियेचे काम सुरू असून २५ टक्क्यांपेक्षा जास्त काम झाल्याची प्रतिक्रिया दिली.
किती काम झाले, याची कल्पना नाही
उपमहापौर भगवान भालेराव हे राणा डम्पिंग ग्राउंड असलेल्या परिसरातून नगरसेवकपदी निवडून आले आहेत. या संदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले की, कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, दीड वर्षांत किती टक्के काम झाले, याबाबत कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.