ठाणेकरांच्या आग्रहाखातर ठाण्यात बिर्याणी फेस्टिवल, शुक्रवारपासून तीन दिवस रंगणार फेस्टिवल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 03:49 PM2018-12-03T15:49:26+5:302018-12-03T15:50:32+5:30
ठाण्यात या पुन्हा एकदा बिर्याणी फेस्टिवल रंगणार असून या वर्षातले हे तिसरे फेस्टिवल आहे.
ठाणे : दिल्ली बिर्याणी, हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, बांबूमध्ये दम केलेली बांबू बिर्याणी अशा तब्बल २० प्रकारांच्या बिर्याणीची चव ठाणेकरांना एकाच छताखाली चाखायला मिळणार आहे. ठाणे, डोंबिवली असा प्रवास करत ठाणेकरांच्या आग्रहाखातर याच वर्षी पुन्हा एकदा ठाण्यात बिर्याणी फेस्टिवल स्वराज्य इव्हेंन्टसतर्फे आयोजित केला आहे.
मागील वर्षी १५ हजाराहून अधिक जणांनी भेट दिलेला, ठाणेकरानी भरभरून प्रतिसाद दिलेला बिर्याणी फेस्टीवल यावर्षी शुक्रवार ते रविवार ७,८ व ९ डिसेंबर याकाळात जांभळी नाका, शिवाजी मैदान येथे भरत आहे. स्वराज्य इव्हेंन्टसतर्फे या बिर्याणी फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले असून खवय्यांना विविध प्रकारच्या बिर्याणीची चव चाखता येणार आहे अशी माहिती स्वराज्य इव्हेंन्टसचे हर्षद समर्थ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. बेहरोज बिर्याणी, इटालियन बिर्याणी बरोबर लेबनीज चीजच्या स्वादाची लेबनीज चीज सीख बिर्य़ाणीची देखील टेस्ट खवय्याना चाखता येणार आहे. शाकाहारींसाठी व्हेज बिर्याणी, पनीर टिक्का बिर्याणी, शाही व्हेज बिर्याणी देखील उपलब्ध असणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी बिर्याणी फेस्टीवलचे उदघाटन होणार आहे तर शनिवार व रविवारी संध्याकाळी ५ ते ११ वेळेत फेस्टीवल सुरू राहणार आहे. खवय्याना बिर्याणीचा आस्वाद फेस्टीवलच्या ठिकाणीही घेता येणार असून पार्सलची देखील सोय उपलब्ध असणार आहे. फेस्टीवलच्या ठिकाणी रोज सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम असणार असून लाईव्ह म्युझिक, शाम ए गजल हा मुशायरा या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलवर सीसीसीटीव्हीची नजर असणार आहे, सुरक्षा रक्षकहि नेमले जाणार आहेत. सोशल मीडियावर या बिर्याणीचे पोस्ट जास्तीत जास्त शेअर करणाऱ्याना मोफत मध्ये बिर्याणी खाण्याची संधी दिली जाणार आहे. या फेस्टिवल मध्ये स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे अशी माहिती सुमेध समर्थ यांनी दिली.