तरुणाईच्या जल्लोषात रंगली ठाण्यातील दिवाळी पहाट, ढोलताशा, डीजे आणि बँड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 04:14 PM2018-11-06T16:14:45+5:302018-11-06T16:17:55+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाट अर्थात दिवाळीचा पहिला दिवस रंगला.
ठाणे: तरुणाईच्या जल्लोष आणि उत्साहात दिवाळीचा पहिला दिवस अर्थात दिवाळी पहाट ठाण्यात रंगली. ढोल ताशा, डीजे, ब्रास बँड साऱ्याचा आनंद तरुणाईने लुटला. यावेळी दिवाळीच्या शुभेच्छांचा वर्षाव होत होता. नृत्य, गाणी आणि जल्लोषात ही पहाट रंगत गेली.
नरक चतुर्दशीला राम मारुती रोड, तलावपाळी येथे एकत्र जमून दिवाळी पहाट साजरी करण्याची परंपरा यंदाही तरुणाईने राखली. सकाळी सहा वाजल्यापासून राम मारुती रोड, तलावपाळी, गोखले रोड यांठिकाणी तरुणाईने येण्यास सुरूवात केली. सकाळी ८ वाजता ही ठिकाणे गर्दीने तुडुंब भरले. काहींनी आपल्या शाळेजवळ भेटून दिवाळी साजरी केली. राम मारुती रोड व तलावपाळी हे गर्दीने तर ओसंडून वाहत होते. प्रत्येक जण पारंपारिक वेशभूषेत आले होते आणि आपल्या मित्र मैत्रिणीला शुभेच्छा देऊन सणाचा आनंद व्यक्त करीत होते. राम मारुती रोड येथील न्यू इंग्लिश स्कूलजवळ ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्यावतीने आगरी कोळी ब्रास बँड, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स समोर ठाणे युवाच्यावतीने डीजे, रॉक बँड, राम मारुती रोडवर द ब्रदर्स प्रतिष्ठानच्यावतीने आणि तलावपाळी येथे खा. राजन विचारे यांच्यावतीने डीजेचे आयोजन केले होते. या ठिकाणी ढोल ताशांचाही गजर झाला. मराठी - हिंदी गाण्यांवर तरुणाई थिरकत होती. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गर्दीचा महापूर ओसंडून वाहत होता. यावेळी पोलीसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. राम मारुती रोड येथील गर्दी पाहता या ठिकाणी येणारे काही रस्ते बंद ठेवण्यात आले होते. यावेळी तरुणाईला शुभेच्छा देण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, आ. संजय केळकर, भाजपच्या अॅड. माधवी नाईक, सभागृह नेते नरेश म्हस्के, आ. निरंजन डावखरे, भाजप ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले हे देखील उपस्थित झाले होते. वंदे मातरम संघच्यावतीने नृत्य आणि फॅशन शो आयोजित केला होता. सेल्फी वेड्या तरुणाईंसाठी या ठिकाणी सेल्फी पाँईंटही उभारला होता.