महोत्सवांमुळे क्रीडासंकुलास अवकळा, मनसेची महापालिकेवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 01:38 AM2019-12-28T01:38:02+5:302019-12-28T01:38:06+5:30
मनसेची महापालिकेवर टीका : ‘अस्वच्छता की ओर एक कदम’चे केले टिष्ट्वट
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडासंकुलाला विविध महोत्सवांमुळे अवकळा आली आहे. अस्वच्छतेमुळे मॉर्निंगवॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. याकडे लक्ष वेधत महापालिकेने ‘अस्वच्छता की ओर एक कदम’ हे नवे घोषवाक्य तयार करावे, असे टिष्ट्वट करत मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी पालिकेच्या कारभारावर टीका केली आहे.
कदम हे शुक्रवारी क्रीडासंकुलामध्ये फेरफटका मारायला गेल्यानंतर त्यांना कचरा, अस्वच्छता दिसली. तसेच महोत्सव पार पडल्यानंतर कचरा जाळण्यात आल्यामुळे परिसरातील तीनचार झाडेही जळल्याचे कदम यांनी नमूद केले आहे. महोत्सवाला मैदान दिल्यानंतर तेथे स्वच्छता राखणे ही महापालिका, संबंधित संस्थेची जबाबदारी असते. याबाबत सातत्याने लक्ष वेधूनही फरक पडत नसल्यामुळे महापालिकेने आता ‘अस्वच्छता की ओर एक कदम’ असे घोषवाक्य तयार करावे, अशी उपरोधिक सूचना त्यांनी केली आहे. महापालिकेवर अशी टीका करणे नागरिक म्हणून पटत नसले, तरी तसे केल्याशिवाय स्वच्छता विभागाच्या यंत्रणेत फरकही पडत नसल्याचे ते म्हणाले.
एकापाठोपाठ एक कार्यक्रम मैदानात होत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी अस्वच्छता झाली होती. लगेच स्वच्छता करण्यासाठी आम्ही सगळे मैदानात आलो आहोत.
- विलास जोशी, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, केडीएमसी