बदलत्या हवामानाचा डोक्याला ‘ताप’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:28 AM2021-06-25T04:28:00+5:302021-06-25T04:28:00+5:30

कल्याण : कोरोनाचे सावट कायम असताना दुसरीकडे बदलत्या हवामानामुळे शहरात ताप, सर्दी, खोकला या आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. ...

'Fever' in the head of changing weather! | बदलत्या हवामानाचा डोक्याला ‘ताप’!

बदलत्या हवामानाचा डोक्याला ‘ताप’!

Next

कल्याण : कोरोनाचे सावट कायम असताना दुसरीकडे बदलत्या हवामानामुळे शहरात ताप, सर्दी, खोकला या आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. ही लक्षणे कोरोनासारखी असल्याने संबंधित रुग्णांनी याकडे दुर्लक्ष न करता खबरदारी म्हणून कोरोना चाचणी करून घ्यावी, जेणेकरून पुढील धोका टाळता येईल, असा मोलाचा सल्ला केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागासह तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

जूनमध्ये मान्सूनला सुरुवात झाली की, पावसाळ्यातील साथींचे आजार डोके वर काढतात. त्यात तापाचे रुग्ण अधिक असतात. तापावरून अन्य आजारांची तपासणी केली जाते. त्यातून डेंग्यू, मलेरिया, टाॅयफॉइड, लेप्टोस्पायरोसिस, स्वाइन फ्लू, चिकुनगुन्या आदी आजारांची लागण मनपा हद्दीतील दाट वस्त्यांसह अन्य ठिकाणच्या लोकवस्तीतून होते. अशावेळी शहरांतील मनपा व खासगी रुग्णालये, दवाखान्यांमध्ये या आजाराच्या रुग्णांची झुंबड उडत असल्याचे दरवर्षी पाहायला मिळते. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट कायम आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे, पण संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. जूनच्या सुरुवातीला चांगला दमदार पाऊस पडला, मात्र गेल्या आठवड्यापासून ऊन-पावसाच्या खेळामुळे वातावरणात झालेल्या बदलात तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत. यात निदानाअंती बहुतांश रुग्ण सामान्य तापाचे आहेत. एखाद्‌दुसरा कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या पाहता, केडीएमसीच्या हद्दीत बहुतांश निर्बंध उठविण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सोशल डिस्टन्सबाबत वेळीच सतर्कता आणि खबरदारी नाही बाळगली, तर पुढे संक्रमणाच्या माध्यमातून धोका वाढण्याची भीती डॉ. आनंद हर्डीकर यांनी व्यक्त केली. तापाबरोबर सर्दी, खोकल्याचे रुग्णही उपचारासाठी येत असल्याची माहिती डॉ. समीर जोशी यांनी दिली.

-----------------------------------------------------

कोरोना चाचणी बंधनकारक

बदलत्या हवामानात तापाचे, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळतात. सध्या तापाचे रुग्ण वाढले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे तपासणीअंती १० पैकी एकच रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळून येत आहे. दरम्यान, आपल्याकडे कोरोनाचे आजही १०० च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोना पूर्णत: नियंत्रणात आलेला नाही. या साथरोगाच्या वातावरणात ताप, सर्दी, खोकला व अन्य काही कोरोनासारखी लक्षणे असल्यास तत्काळ कोरोना चाचणी करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुढील धोका टळेल. जर कोरोना नसल्याचे निदान झाल्यास त्याप्रमाणे पुढील उपचार घेऊ शकतात.

- डॉ. प्रतिभा पानपाटील, साथरोग प्रतिबंधक विभाग अधिकारी, केडीएमसी

------------------------------------------------------

Web Title: 'Fever' in the head of changing weather!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.