समन्वयकाअभावी दिल्लीत महाराष्ट्रातून कमी अर्ज, सांस्कृतिक समितीसंदर्भात डॉ. प्रकाश खांडगे आणि नंदेश उमप यांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 09:42 AM2022-08-16T09:42:22+5:302022-08-16T09:42:40+5:30
उत्सव ७५ अंतर्गत टाऊन हॉल येथे सोमवारी ‘संगीत आणि लोकसंगीत’ यावर परिसंवाद झाला. यावेळी उमप म्हणाले की, अर्जांची छाननी करताना मणिपूरमधून ७५ अर्ज आले होते. महाराष्ट्रातील केवळ पाच आले.
ठाणे : सांस्कृतिक संस्थांना अनुदान देणाऱ्या केंद्र सरकारच्या केंद्रीय समितीकडे महाराष्ट्रातून फार कमी अर्ज जातात. महाराष्ट्रात सांस्कृतिक संस्थांचा योग्य समन्वय नसल्यामुळे अर्जांची संख्या अत्यल्प असते, अशी खंत लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांनी व्यक्त केली. ज्यावेळी या समितीकडे अर्ज येतात, त्यातून इतर राज्यांतील सांस्कृतिक संस्थांचा आणि कलावंतांचा समन्वय पाहायला मिळतो. महाराष्ट्रातून येणाऱ्या अर्जांची संख्या वाढली पाहिजे, अशी अपेक्षा दोघांनी व्यक्त केली.
उत्सव ७५ अंतर्गत टाऊन हॉल येथे सोमवारी ‘संगीत आणि लोकसंगीत’ यावर परिसंवाद झाला. यावेळी उमप म्हणाले की, अर्जांची छाननी करताना मणिपूरमधून ७५ अर्ज आले होते. महाराष्ट्रातील केवळ पाच आले. कदाचित मणिपूरमध्ये हेवेदावे नसावे. जे आमच्या महाराष्ट्रात आहेत. एकमेकांना मदत करायला हवी. एवढे मुक्त विचार का नाही?
उमप यांच्या दाव्याला दुजोरा देत डॉ. खांडगे म्हणाले की, त्या कमिटीवर मीही आधी होतो. महाराष्ट्रातून किती संस्थांना अनुदान मिळते हे मी पाहिले. त्यावेळी ज्यांनी अर्ज केले त्यापैकी तीन ते चार संस्था बोगस होत्या. ज्येष्ठ गायक पं. सुरेश बापट यांनी सुरुवातीला बंदिशी सादर केली.
शास्त्रीय गायिका श्रुती गोखले यांनी आपल्या गायनाचा प्रवास उलगडला. धर्मवीर चित्रपटातील देवीचे गाणे करण्याचा हट्ट मी पकडला होता आणि ते करण्याची संधी मला मिळाली. माझा जन्म या ठाण्यात झाल्याचा मला अभिमान आहे, असे संगीतकार महेश ओगले यांनी सांगितले.
परिस्थितीनुसार संगीत द्यावे लागते!
एखाद्या गाण्याला संगीत देताना थोडीफार तडजाेड करावी लागते. तडजाेड न करता आपण त्यातून शिकू या असा विचार केला तर नवीन शिकायला मिळते. कधी कधी परिस्थितीनुसारही गाण्याला संगीत द्यावे लागते, हे सांगताना टाइमपास चित्रपटाचा किस्सा ओगले यांनी सांगितला.