पक्षप्रवेशाचा फज्जा; नेत्यांची निराशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:00 AM2018-11-02T00:00:16+5:302018-11-02T00:00:33+5:30
भाजपाकडून पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. दिग्गज प्रवेश करतील, असे वाटत होते. मात्र, भाजपा संबंधित पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी प्रवेश केल्याने या कार्यक्रमाचा फज्जा उडाला.
उल्हासनगर : भाजपाकडून पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. दिग्गज प्रवेश करतील, असे वाटत होते. मात्र, भाजपा संबंधित पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी प्रवेश केल्याने या कार्यक्रमाचा फज्जा उडाला.
शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं आदी पक्षांतील दिग्गजांनी प्रवेश केला नसल्याने कार्यक्रमाचे आयोजक व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पक्षविस्ताराच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले. रवी पाटील, अमर लुंड, विनोद ठाकूर यांच्यासह मोजक्याच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. गेल्या आठवड्यात ओमी टीमने कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा घेऊन भाजपाला शह देण्याचा प्रयत्न केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून शहर भाजपाने प्रचंड गाजावाजा करत बुधवारी पक्षप्रवेश कार्यक्रम ठेवला होता. कार्यक्रमाला राज्यमंत्री चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, श्वेता शालीन, महापौर पंचम कलानी, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, प्रदेश सचिव प्रकाश माखिजा, सभागृह नेते जमनू पुरस्वानी, प्रदीप रामचंदानी आदी उपस्थित होते. शिवसेना, रिपाइं, साई, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आदी पक्षांतील दिग्गज नेते व पदाधिकारी पक्षात प्रवेश करतील, अशी सर्वांना आशा होती.
भाजपा नगरसेविका मीनाक्षी पाटील यांचे पती रवी, शिवसेनेचे माजी नगरसेवक व उपमहापौर विनोद ठाकूर, साई पक्षाच्या नगरसेविका कांचन लुंड यांचे पती अमर यांनी प्रवेश केला. पाटील यांचे मोठे बंधू विजय पाटील भाजपाचे नगरसेवक आहेत. तसेच विनोद ठाकूर यांचा मुलगा भाजपा युवक संघटनेचा ठाणे व पालघर जिल्ह्यांचा महासचिव आहे, तर अमर लुंड हे महापौर निवडणुकीत भाजपासोबत होते.
कार्यक्रमाला गालबोट
कॅम्प नं.-५ येथील साई झुलेलाल प्रवेशद्वाराशेजारी भाजपा कार्यकर्त्यांनी नेत्याच्या आगमनाच्या आनंदापोटी फटाक्यांची आतषबाजी केली. फटाक्यांमुळे साई झुलेलाल प्रवेशद्वाराजवळ अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली.
२५ डिसेंबरला कार्यक्रम
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २५ डिसेंबरला पुन्हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती सभागृहनेते जमनुदास पुरस्वानी यांनी दिली. त्यावेळी इतर पक्षांतील दिग्गज प्रवेश करतील, अशी आशाही पुरस्वानी यांनी व्यक्त केली.