आयुक्तालय क्षेत्रात ३५,५०१ बाप्पांना साश्रुनयनाने निरोप; चोख बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 11:49 PM2019-09-13T23:49:20+5:302019-09-13T23:49:31+5:30
५७९ सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचे विसर्जन
ठाणे : गेल्या १० दिवसांपासून घरोघरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील विविध विसर्जनघाटांवर गणेशभक्तांनी गुरुवारी साश्रुनयनाने निरोप दिला. शहर पोलीस आयुक्तालयात अनंत चतुर्दशीला ७५९ सार्वजनिक आणि ३४ हजार ७४२ घरगुती बाप्पांचे विधिवत विसर्जन केले. यावेळी राज्यात पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवणाऱ्या ठाणे महापालिके तर्फे निर्माण केलेल्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेंतर्गत दहाव्या दिवशी सहा हजार १९० गणेशमूर्तींचे विसर्जन केले.
विसर्जनादरम्यान वरुणराजा बरसत असतानाही शहरातील विविध विसर्जन घाटांवर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आबालवृद्धांनी एकच गर्दी केली होती. यावेळी लोकमत माध्यम प्रायोजक असलेल्या ठाण्यातील हिंदू जनजागृती मित्र मंडळ आणि ठाणे रेल्वेस्टेशन परिसरातील जगदंबा मित्र मंडळाने मिरवणूक काढून आपल्या बाप्पाला निरोप दिला.
विसर्जनासाठी गणेश मंडळांकडून काढण्यात येणाºया मिरवणुका लक्षात घेऊन पोलिसांनी कंबर कसली होती. विसर्जनघाटांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवला होता. तसेच मिरवणुकीच्या मार्गांवर अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी नाक्यानाक्यांवर पोलीस तैनात केले होते. त्यानुसार, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील विसर्जन घाटांवर ३५ हजार ५०१ बाप्पांना साश्रुनयनाने निरोप दिला.
एक दिवस उशिराने बाप्पांना निरोप
मुंब्रा : येथील अग्निशमन केंद्रामधील बाप्पांना परंपरेप्रमाणे यावर्षीही एक दिवस उशिरा म्हणजे बाराव्या दिवशी निरोप देण्यात आला. येथील मूर्तीचे मुंब्रेश्वर महादेव मंदिराजवळील तलावात शुक्र वारी विसर्जन करण्यात आले. अग्निशमन कर्मचारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन घाटांवर कर्तव्य बजावत असतात. यामुळे मूर्तीचे एक दिवस उशिरा विसर्जन करण्यात आले.