भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:26 AM2019-07-24T00:26:24+5:302019-07-24T00:26:33+5:30

१४ तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरूच

Fierce chemical warehouse fire; | भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Next

भिवंडी : भिवंडीतील वळगाव येथील प्रेरणा कॉम्प्लेक्समधील एका केमिकल गोदामाला सोमवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग विझविण्यासाठी भिवंडी, ठाणे, कल्याण, उल्हासनगर आणि मुंबई येथील अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या असून, अजूनही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत जिवीतहानी झाली नसली, तरी प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.

मानकोली अंजुरफाटा मार्गावरील प्रेरणा कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एका केमिकल गोदामाला आग लागली. ही आग भीषण असल्याने केमिकल गोदामाच्या बाजुला असलेल्या डांबर, रबर, बेडशीट व फोम गादीच्या गोदामानेदेखील पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. तब्बल १४ तासांनातरही या आगीचे अग्नीतांडव सुरूच होते. त्यामुळे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मुंबई अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. मात्र उशिरापर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याची अधिकृत माहिती मिळत नसली, तरी शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

भिवंडीत केमिकल गोदामे मोठ्या प्रमाणात असून, येथे आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मात्र या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाबरोबरच महसूल विभाग अजूनही ठोस भूमिका घेत नसल्याने भविष्यात मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तब्बल ३४३ गोदामांमध्ये रसायनांचा बेकायदा साठा
भिवंडीत काल्हेर, कशेळी, राहणाळ, वळ, गुंदवली, दापोडा, माणकोली, अंजूर, केवणी, कोपर, सारंग, सुरई, दिवे अंजूर, वेहळे, ओवळी, सरवली, कोनगाव, पिंपळास, सोनाळे, भोईरगांव, वाहुली, सापे, वडपे, पडघा आदी ग्रामपंचायतींच्या हद्दीत हजारो गोदामे असून यातील वळ, माणकोली, राहणाळ, गुंदवली, काल्हेर, दापोडे, सरवली, कोपर, पूर्णा, कोनगाव, भोईरगाव, वडपे, सोनाळे या ठिकाणी केमिकलची

३४३ बेकायदेशीर गोदामे थाटण्यात आली आहेत.
या गोदामांमध्ये अत्यंत ज्वलनशील अशा अतिधोकादायक केमिकलचा साठा केला जात आहे. या केमिकल साठ्यांना वारंवार आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. पाच वर्षांपूर्वी भिवंडी ठाणे महामार्गावरील राहनाळ येथे लागलेल्या आगीत लाकडाच्या वखारीत झोपेत असलेल्या ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर दापोडा येथे लागलेल्या आगीत ४ कामगार होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

गोदामांना वारंवार आगी लागण्याच्या घटना सुरु असताना सोमवारी मध्यरात्री वळगाव येथील केमिकलच्या गोदामाला भीषण आग लागली. त्यामुळे बेकायदेशीर केमिकल गोदामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्य शासनाने या जीवघेण्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील बेकायदेशीर केमिकल गोदामे बंद करण्याचे आदेश २0१८ च्या पावसाळी अधिवेशनात महसूल विभाग व पोलीस खात्याला दिले होते. मात्र, दर महिन्याला होणाऱ्या लाखोंच्या आर्थिक व्यवहारामुळे याकडे स्थानिक पोलीस व महसूल अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने गोदामांना आग लागण्याचे प्रकार सतत वाढत आहेत.

भोपाळ दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती : भिवंडी शहरासह ग्रामीण परिसरात असलेल्या शेकडो गोदामांमध्ये बेकायदेशीरपणे रासायनिक द्रव्याची साठवणूक केली जाते. या केमिकल साठ्यांवर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले होते. मात्र, भिवंडी महसूल विभागाने या आदेशाकडे पुर्णत: दुर्लक्ष केल्यामुळे या अनधिकृत गोदामांना वारंवार आग लागण्याच्या घटना नेहमी घडत आहेत. त्यामुळे परिसरात राहणाºया नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. भिवंडीच्या गोदामपट्ट्यात रासायनिक द्रव्याचा साठा व अन्य साधनसामुग्रीच्या ७३२ गोदामांना वर्षभरात आग लागल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे भिवंडीत भोपाळ वायुगळतीसारखी मोठी दुर्घटना होण्याचा धोका असून, शासनाने केमिकलचा साठा करणाºया या गोदामांवर तत्काळ कारवाई करून ती बंद करावीत, अशी मागणी भिवंडीतील नागरिकांकडून केली जात आहे.

गोदामांना ठोकणार सील
भिवंडीच्या गोदामपट्ट्यातील केमिकल गोदामांना वारंवार आग लागत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रांत अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी केमिकल गोदामे बंद करण्यासाठी ८५ गोदाम मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. या नोटीसची मुदतदेखील संपलेली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून केमिकल गोदामांना सील लावण्याची कारवाई हाती घेतली जाणार असल्याची माहिती या भिवंडीचे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी दिली आहे.

Web Title: Fierce chemical warehouse fire;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग