भिवंडी डायपर बनवणाऱ्या कंपनीस भीषण आग, अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण
By नितीन पंडित | Published: June 11, 2024 11:15 AM2024-06-11T11:15:32+5:302024-06-11T11:15:44+5:30
घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
भिवंडी : तालुक्यातील सरवली एम आय डी सी येथील सदाशिव हायजिन प्रा.ली. कंपनी या डायपर बनविणाऱ्या फॅक्टरीस पहाटे तीन वाजताच्या सुमारास भीषण आग लागण्याची दुर्घटना घटना घडली आहे. तळ अधिक तीन मजली या कंपनी इमारतीं मध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस, कपडा व प्लास्टिकचा कच्चा माल मोठ्या प्रमाणावर साठवण्यात आला होता. त्यामुळे पाहता पाहता ही आग सर्वत्र पसरली व या आगीच्या ज्वालांनी संपूर्ण इमारत व्यापली गेली.
घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र आग भीषण असल्याने भिवंडी पाठोपाठ कल्याण ठाणे येथील अग्निशामक यंत्रणेला पाचारण करण्यात आले.परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे आग विझविण्यात अडथळा येत होता.त्यानंतर तब्बल सात तासांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश मिळाले.
आग नक्की कशा मुळे लागली हे अजून हि स्पष्ट झाले नसून या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हनी झाली नाही.सरवली एम आय डी सी परिसरात शेकडो कंपन्या असून या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा अथवा पाण्याची उपलब्धता या सोयी नसल्याने अनेक आगीच्या दुर्घटना वेळी कोट्यवधींचे नुकसान झाले आहे तरी याकडे प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.