भिवंडीत केमिकल गोदामांना भीषण आग, दहा पेक्षा अधिक गोदामं जळून खाक
By नितीन पंडित | Published: May 12, 2023 06:40 PM2023-05-12T18:40:37+5:302023-05-12T18:41:39+5:30
ही आग एवढी भीषण होती की आगीचे लोट सर्वदूर पसरले होते.
भिवंडी: तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील लक्ष्मी कंपाउंड येथील शहा वेअर हाऊस व देशमुख वेअर हाऊस या ज्वलनशील केमिकल साठविलेल्या गोदामांना शुक्रवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग एवढी भीषण होती की आगीचे लोट सर्वदूर पसरले होते. या आगीत सुमारे दहा ते बारा गोदाम जळून खाक झाली आहेत .
आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आगीची व्याप्ती पाहता कल्याण व ठाणे अग्निशमन दलाच्या गाड्यांना बोलाविण्यात आले. परिसरातील स्थानिक नागरिकांनी खाजगी टँकर चालकांकडून पाणी उपलब्ध करून दिल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. केमिकल ड्रमचा स्फोट होऊन केमिकल ड्रम इतरत्र पडून गोदामांना आगी लागण्याचे सत्र सुरू आहे.
भिवंडी येथील रहानाळ गावातील देशमुख कम्पाउंड मधील रासायनिक गोडाउन ला भीषण आग . आग विझविण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयन्त सुरु . (व्हिडिओ : विशाल हळदे)https://t.co/CbvSFUB0GJpic.twitter.com/8OIN9YW7Lt
— Lokmat (@lokmat) May 12, 2023
या आगीत नजीकच्या मोकळ्या मैदानात उभ्या केलेल्या दोन ट्रक जळून खाक झाल्या असून एका पाण्याच्या टँकर चालकाने प्रसंगावधान राखत तेथील केमिकलने भरलेला टँकर सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळविले आहे. आग अजून धुमसत असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी या दुर्घटनेत झाली नाही. सुमारे पाच तास धुमसत असणारी ही आग पूर्ण विझण्यासाठी किमान दहा तासाहून अधिक अवधी लागेल अशी माहिती भिवंडी अग्निशामक दलाचे अधिकारी कमलाकर कनाते यांनी दिली आहे.
दरम्यान, या आगीचे नेमकी कारण अजून समजू शकले नाही. विशेष म्हणजे ही आग बाजूच्या वाफेकर कंपाउंड येथील कच्चा झोपड्यांपर्यंत पोहचली होती. परंतु येथील झोपड्या रिकाम्या असल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे .