डागडुजीसाठी पंधरा दिवस डोंबिवलीतील तरण तलाव बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 04:48 PM2018-04-03T16:48:33+5:302018-04-03T16:48:33+5:30
डागडुजीच्या कामासाठी डोंबिवलीमधील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ह.भ.प.सावळाराम क्रिडा संकुलातील तरण तलाव २८ मार्चपासून १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. मात्र ऐन सुटीत लहान मुलांची होणारी गैरसोय लक्षात घेता मनसेने मंगळवारी तरण तलावाच्या ठिकाणी भेट देत महापालिकेने जाणिवपूर्वक हा तलाव सुट्यांच्या मोसमात बंद ठेवण्यात येत असल्याचा आरोप केला.
डोंबिवली: डागडुजीच्या कामासाठी डोंबिवलीमधील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ह.भ.प.सावळाराम क्रिडा संकुलातील तरण तलाव २८ मार्चपासून १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. मात्र ऐन सुटीत लहान मुलांची होणारी गैरसोय लक्षात घेता मनसेने मंगळवारी तरण तलावाच्या ठिकाणी भेट देत महापालिकेने जाणिवपूर्वक हा तलाव सुट्यांच्या मोसमात बंद ठेवण्यात येत असल्याचा आरोप केला. तसेच आठ दिवसांत ही सुविधा सुरू न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला.
परीक्षा संपल्या आणि शाळांना सुट्ट्या लागल्या, की लहानग्यांना खेळांचे वेध लागतात. कुणी स्विमिंग शिकतो, तर कुणी स्केटिंग, मात्र तरण तलाव डागडुजीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. महापालिकेचा हा तरण तलाव आॅलिम्पिक दर्जाचा असून येथे पोहायला येणा-यांची संख्या लक्षणिय आहे. मात्र ही दुरुस्ती ऐन सुट्ट्या लागल्यानंतर करण्यात येत असल्यानं बच्चेकंपनी नाराज झालीये. याबाबत माहिती मिळल्यांनातर मनसे पदाधिका-यांनी धडक देत पालिका प्रशासनाला फैलावर घेतले. नेमका उन्हाळ्याच्या सुट्टीतच दुरुस्तीचे काम कसे काढले जाते? खासगी तरण तलावांचा धंदा जोरात व्हावा म्हणून मुद्दाम हा प्रकार होतोय का? अशा प्रश्नांचा भडीमार करत मनसेने ऐन मोसमात सुविधा बंद का ठेवली असा सवाल केला. आठ दिवसांच्या आत हा तरण तलाव सुरू झाला नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी महापालिकेचे गटनेते प्रकाश भोईर, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
१६ मार्च रोजी या तलावाच्या डागडुजीच्या कामासाठी ४ लाखांची फाइल मंजूर झाली. त्यानंतर २८ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत ही सर्व कामे करण्यात येणार आहेत. त्या कामामंध्ये मुख्य तलावातील फरशा निखळल्या असून त्या अबालवृद्धांना लागतात, शिड्या तुटल्या आहेत, लोखंडी बार तुटले आहेत, डागडुजीमध्ये वेल्डिंगची काम अधिक आहेत, त्याखेरीज अन्य कामे झाल्यावर तात्काळ ही सुविधा सुरु होइल - शैलेश मळेकर, अभियंता, केडीएमसी