भिवंडीतील रिक्षांत पाचवी सीट सुरू, नवी लूटमार : नेते आणि वाहतूक पोलिसांचा वरदहस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 05:48 AM2017-09-12T05:48:18+5:302017-09-12T05:48:24+5:30
अवास्तव भाडे आकारणीवरून सुरू असलेला वाद सुटत नसतानाच भिवंडीतील रिक्षांमध्ये आता पाचव्या सीटची पद्धत रूढ होऊ लागली आहे. याआधी रिक्षाचालकाच्या शेजारी बिनदिक्कत चौथी सीट भरली जात होती. त्याकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने आता चालकाची सीट आणखी रूंद झाली असून त्यावर दोन्ही बाजूंना दोन प्रवासी बसवून पाचव्या सीटची पद्धत रूढ होऊ लागली आहे.
भिवंडी : अवास्तव भाडे आकारणीवरून सुरू असलेला वाद सुटत नसतानाच भिवंडीतील रिक्षांमध्ये आता पाचव्या सीटची पद्धत रूढ होऊ लागली आहे. याआधी रिक्षाचालकाच्या शेजारी बिनदिक्कत चौथी सीट भरली जात होती. त्याकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने आता चालकाची सीट आणखी रूंद झाली असून त्यावर दोन्ही बाजूंना दोन प्रवासी बसवून पाचव्या सीटची पद्धत रूढ होऊ लागली आहे.
रिक्षा संघटनांचे नेते, राजकीय नेते आणि वाहतूक पोलिसांचा वरदहस्त असल्याने हा प्रकार सुरू झाला आहे.
रिक्षावंर जरी तीन प्रवासी असे लिहिलेले असले तरी चौथी सीट घेतल्याशिवाय थांब्यावरून रिक्षा हलत नाहीत. पण आता पाचव्या सीटसह रिक्षा जेव्हा धावते तेव्हा चालकाला कशीबशी जागा मिळते. शिवाय वळणावर रिक्षा कलंडण्याचा धोका असतो. यातून पुढे बसणाºया दोन्ही प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या वाहनाच्या रचनेत पुढे एकच व्यक्ती बसू शकेल अशी जागा आहे.
वाहतूक नियमानुसार पहिल्या टप्प्याला अठरा रूपयांचा आकार घेणे बंधनकारक असतानाही भिवंडी आणि परिसरातील रिक्षाचालक प्रत्येक प्रवाशाकडून दहा रूपये याप्रमाणे चार सीटमागे चाळीस आणि पाच सीटमागे पन्नास रूपयांची वसुली करतात. मीटरप्रमाणे भाडे आकारणी होत नसतानाही शेअरच्या बाड्यात सरसकट २५ टक्के वाढ केली जाते.
बेकायदा रिक्षांचा सुळसुळाट :भिवंडी आणि परिसरांत मिळून ३० हजारांपेक्षा जास्त परवानाधारक रिक्षा असून १० हजारांपेक्षा जास्त नल्ला रिक्षा धावत आहेत. एकही रिक्षाचालक गणवेशात नसतो. त्यांच्या खिशावर बॅच नसतो, तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही. मुदत संपलेल्या रिक्षांचा तोडून नष्ट करण्याची कारवाई आजवर झालेली नाही.
चालकाच्या तपशिलाला ठेंगा
रिक्षाचालकाच्या सीटमागे चालक आणि रिक्षाबाबत माहिती लावणे बंधनकारक असतानाही आतापर्यंत अवघ्या एक टक्का चालकांनीच हा तपशील लावला आहे. तो तपशील लावावा म्हणून वाहतूक पोलीच आग्रही नसल्याने त्यांचे फावले आहे.