पाचव्या-सहाव्या मार्गिका लवकरच होणार पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:40 AM2021-03-05T04:40:59+5:302021-03-05T04:40:59+5:30
ठाणे : मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा या पाचव्या मार्गिकेचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. यासाठी मुंब्रा रेतीबंदर येथे ...
ठाणे : मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा या पाचव्या मार्गिकेचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. यासाठी मुंब्रा रेतीबंदर येथे उन्नत मार्गावर दोन लोखंडी तुळई बसविण्यात येणार आहेत. राजस्थान येथून आणलेल्या या तुळया प्रत्येकी ३५५ टन वजनाच्या आणि ८० मीटर लांबीच्या आहेत. यासाठी रेल्वेचे १५० कामगार, ३२ रोलर आणि एका यंत्राच्या मदतीने हे काम पूर्ण केले जाणार आहे. ७ आणि २१ मार्च या दोन दिवसांत हे काम करण्यात येणार आहे. हा कामाचा टप्पा सर्वांत महत्त्वाचा टप्पा असून, तुळया उभारल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण होणार आहे. मात्र, यासाठी मुंब्रा बाह्यवळणावरील संपूर्ण वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे. त्याचा फटका ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण डोंबिवली येथील वाहतूक व्यवस्थेवर होणार आहे.
मध्य रेल्वेवरील उपनगरीय गाड्यांच्या फेऱ्या वाढाव्यात, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम करण्यात येत आहे. अनेक परवानग्यांमुळे हा प्रकल्प रखडला होता. सध्या या प्रकल्पाच्या मुंब्रा रेतीबंदर खाडी किनारी असलेल्या उन्नत मार्गाच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या उन्नत मार्गासाठी रेल्वेला दोन लोखंडी तुळ्या उभाराव्या लागणार आहे. त्यामुळे रेतीबंदर येथून जाणारा मुंब्रा बाह््यवळण मार्गावरील रस्ते वाहतूक बंद करावी लागणार आहे. रेल्वे प्रशासन यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांशी संपर्क साधत होती. मात्र, हा रस्ता बंद झाल्यास संपूर्ण शहर वाहतूककोंडीत अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कामासाठी वाहतूक पोलिसांकडून परवानगी देण्यात येत नव्हती. अखेर ती मिळाल्याने सात आणि २१ मार्चला रेल्वे प्रशासनाने हे काम हाती घेतले आहे. हा कामाचा टप्पा सर्वांत महत्त्वाचा टप्पा असून, तुळया उभारल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण होणार आहे.