ठाण्यातील वाचक कट्ट्यावर अभिवाचनातून आनंद म्हसवेकर ह्यांच्या 'फिफ्टी-फिफ्टी' नाटकाचे सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 04:20 PM2019-07-13T16:20:05+5:302019-07-13T16:22:47+5:30
वाचक कट्टा म्हणजे वाचनसंस्कृतीचे जतन व्हावे मराठी भाषेचे अस्तित्व अबाधित राहावे म्हणून लेखक दिग्दर्शक किरण नाकती ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कट्टेकऱ्यांनी सुरू केलेला एक प्रामाणिक प्रयत्न.
ठाणे : वाचक कट्ट्याने विविध साहित्यिक व त्यांच्या संहितेचे अभिवाचन सादरीकरण करत ४९ कट्ट्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला.ह्या प्रवासात अनेक अनुभवी आणि नवोदित वाचकांनी अभिवाचनातून मराठी साहित्याचे आगळे विश्व वाचक कट्ट्यावर निर्माण केले. वाचक कट्टा क्रमांक ४९ देखील ठरला विशेष. मराठी चित्रपट नाट्य आणि मालिका क्षेत्रातील ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक आनंद म्हसवेकर ह्यांच्या फिफ्टी-फिफ्टी ह्या नाटकाचे अभिवाचनरुपी सादरीकरण वाचक कट्ट्यावर झाले.
ज्येष्ठ लेखक व दिग्दर्शक आनंद म्हसवेकर, ज्येष्ठ अभिनेते नंदू गाडगीळ, अभिनेत्री मीनाक्षी जोशी ह्यांनी ह्या नाटकाचे धम्माल विनोदी सादरीकरण सादर केले.सादर वाचकांनी अभिवाचनातून नाटकातील पात्रे रसिक प्रेक्षकांसमोर सुंदररित्या उभी केली.लेखक दिग्दर्शक आनंद म्हसवेकर ह्यांच्या रंगमंचाची अट नसलेल्या नाटकांपैकी हे नाटक.मराठी नाटक सर्वसामान्य प्रेक्षक तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहचण्यासाठी त्याला नेपथ्य प्रकाश योजना संगीत ह्या बंधनातून मुक्त करून नाटक सादर करता येऊ शकते हे आनंद म्हसवेकारांच्या अनेक नाटकांनी सिद्ध केले.'फिफ्टी-फिफ्टी' म्हणजे रंगकर्मींच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याशी सांगड घालणारे हे नाटक.दोन रंगकर्मी मित्रांच्या संवादातून होणार त्यांचा कलसृष्टीत प्रवास त्यांना मिळणाऱ्या अनेक व्यक्तिरेखा आनंद म्हसवेकर,नंदू गाडगीळ आणि मीनाक्षी जोशी यांनी सुंदररित्या सादर केल्या.अभिवाचनातून मांडलेला निखळ विनोद उपथीत प्रेक्षकांना मनापासून हसवून गेला.
ज्येष्ठ लेखक व दिग्दर्शक आनंद म्हसवेकर, ज्येष्ठ अभिनेते नंदू गाडगीळ, अभिनेत्री मीनाक्षी जोशी ह्यांसारख्या दिग्गजांनी येऊन वाचक कट्ट्यावर एक धम्माल विनोदी नाटक दर्दी प्रेक्षकांच्या गर्दीसमोर अभिवाचनातून सादर केले म्हणजे खरोखरच वाचक कट्टा स्थापन करण्याचा उद्देश सफल होताना दिसतोय.लहान मुले आणि तरुण प्रेक्षकांची उपस्थिती म्हणजे वाचनसंस्कृती जोपासण्याचा कार्य योग्य दिशेने चालू आहे .४९ कट्ट्याच्या प्रवास खूपच प्रेरणादायी होता.आज आनंद म्हसवेकर सर,नंदु गाडगीळ सर आणि मीनाक्षी जोडही ह्यांच्या सादरीकरणातून प्रत्येकाला काही तरी शिकायला नक्कीच मिळाले असेल.असे मत अभिनय कट्टा,वाचक कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.