पन्नास रुपयांची लाच पडली महागात, वाहतूक पोलीसाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 04:26 AM2019-02-18T04:26:36+5:302019-02-18T04:56:11+5:30
वाहतूक पोलीसाला अटक : सोमवारी जामीन अर्जावर सुनावणी
ठाणे : कारवाईची कायदेशीर पावती न देण्यासाठी राबोडीतील रिक्षावाल्याकडून १०० रु पयांच्या लाचेची मागणी करून ५० रु पये घेताना ठाणे शहर वाहतूक शाखेचा पोलीस शिपाई गिरीश अहिरराव याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्र वारी संध्याकाळी ठाणे स्टेशन परिसरात केली. शनिवारी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून जामिनासाठी केलेल्या अर्जावर येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे.
राबोडीतील क्रांतीनगर येथील तक्र ारदार अफजल शेख (२८) हा रिक्षाचालक असून १२ फेब्रुवारी रोजी तो रिक्षा चालवताना आरटीओ नियमानुसार सफेद रंगाचा गणवेश परिधान केला नव्हता. यावेळी ठाणे पश्चिम रेल्वेस्थानकासमोर कर्तव्यावर असलेल्या अहिरराव यांनी शेख यांना अडवून गणवेश नसल्याने कारवाईची भीती दाखवली. तडजोड झाल्याने पोलीस शिपाई अहिरराव यांनी चालक शेख यांच्याकडून ५० रु पयांची रक्कम स्वीकारली. मात्र, त्याची कुठलीही रीतसर पावती न दिल्याने याबाबत रिक्षाचालकाने ठाणे लाचलुचपतविरोधी पथकाकडे तक्र ार दाखल केली होती. त्यानुसार, पडताळणीमध्ये शिपाई अहिरराव यांनी लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर त्यांना अटक केली. शनिवारी न्यायालयात हजर केले. दरम्यान, त्याने जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. सरकारी वकील संजय मोरे यांनी विरोध दर्शवल्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश दिले आहेत.