लढा कोरोनाशी : सोसायटीत बनवले कोविड केअर सेंटर, ३५ रुग्णांनी घेतले उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 12:46 PM2020-10-18T12:46:39+5:302020-10-18T12:47:36+5:30
सोसायटीचे सचिव सुनील घेडगे म्हणाले, सोसायटीत १७८ सदनिका आहेत. मार्चपासून आतापर्यंत सोसायटीतील ३५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार व त्यांची आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठी सोसायटीने पुढाकार घेतला.
कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने जम्बो आरोग्य सोयीसुविधा उभारल्या आहेत. मात्र, पूर्वेतील रोझाली एलएक्स या सोसायटीने आपल्या आवारातच कोविड केअर सेंटर चालविल्याने सोसायटीतील ३५ रुग्णांवर उपचारासाठी अन्य कुठेही जाण्याची वेळ आली नाही. त्यामुळे घरच्याघरी राहून कोविडमुक्त होण्याचा आदर्श या सोसायटीने घालून दिला आहे.
अन्य सोसायटीने हा आदर्श घेतल्यास महापालिकेच्या आरोग्यव्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.
सोसायटीचे सचिव सुनील घेडगे म्हणाले, सोसायटीत १७८ सदनिका आहेत. मार्चपासून आतापर्यंत सोसायटीतील ३५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार व त्यांची आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठी सोसायटीने पुढाकार घेतला. त्यामुळे घरच्याघरीच राहून रुग्ण उपचार घेत आहेत. सोसायटीने प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझरची सुविधा केली होती. तसेच मास्कचे वाटप केले होते. सोसायटीतील रहिवासी डॉ. एस.पी. काकरमठ यांच्या मदतीने रुग्णांवर उपचार केले.
त्याचबरोबर सोसायटीत कोरोना रुग्ण आढळल्यानंतर त्याला होम आयसोलेशन केले गेले होते. त्यामुळे त्याला व त्याच्या कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू त्याच्या घरपोहोच देण्याची व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर एकाच घरात तीन जणांना लागण झाल्यास त्यांच्या घरपोच सगळ्या जीवनावश्यक वस्तू पोहोचविल्या गेल्या होत्या. तसेच त्यांच्या घरी सोसायटीच्या नजीक असलेल्या एका पोळीभाजी केंद्रातून डबा दिला गेला. ते पुढे म्हणाले, एका घरात मुलगा, पत्नी व पती या तिघांना कोरोनाची लागण झाली. त्यांना त्यांच्या घरातच क्वारंटाइन केले गेले. मात्र, त्यांचे आईवडील हे वयोवृद्ध होते. आईचे वय ८० वर्षे तर वडिलांचे वय ८२ वर्षे होते. या दोघांना कोरोनाची सौम्य प्रकाराची लक्षणे दिसून आली. शेजारीच एक सदनिका रिक्त असल्याने या आजीआजोबांची त्या सदनिकेत राहण्याची व्यवस्था केली.
कागदपत्रांची केली पूर्तता -
एखाद्या रुग्णाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर त्याच्यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे करावी लागणारी कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करूनच सोसायटीत त्यांच्यावर उपचार केले गेले.