खबरी असल्याच्या संशयातून दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:41 AM2021-04-27T04:41:34+5:302021-04-27T04:41:34+5:30
कल्याण: येथील पश्चिमेकडील आंबिवलीतील इराणी वसाहतीत दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी खडकपाडा ...
कल्याण: येथील पश्चिमेकडील आंबिवलीतील इराणी वसाहतीत दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात १५ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष बाब म्हणजे पोलिसांसमोरच ही राडेबाजीची घटना घडली. लोखंडी रॉड आणि तलवारीचाही यावेळी वापर करण्यात आला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तू सल्वी युसूफ सय्यद इराणी सोबत का फिरत आहेस? तसेच त्याच्यासोबत का राहत आहेस? असे बोलल्याने कौसर जाफरी हिने लाला समीर इराणी याला तू मला विचारणारा कोण आहेस? सल्वी माझा मित्र असून मी कोणाबरोबरही फिरेन असे उत्तर दिले. याचा राग लालाला आला आणि त्याच्यासह इतर चौदा जणांनी कौसर आणि अन्य चौघांवर हल्ला चढविला. दरम्यान, सल्वी हा खबरी असल्याच्या संशयावरून एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला केल्याचे बोलले जात असून याआधी इराणी जमावाकडून पोलिसांवर हल्ले करून त्यांच्या ताब्यातील चोरटे पळवून लावण्याचे प्रकार वसाहतीत वारंवार घडले आहेत,परंतु रविवारच्या घटनेत पोलिसांसमोरच दोन गटात झालेली हाणामारी चर्चेचा विषय ठरली आहे.
---------------------------------------------------
जीवे मारण्याच प्रयत्न
कल्याण: राजा पराशर या २७ वर्षीय तरुणाला राहुल कांबळे, संदीप आणि नागेश दळवी या तिघांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी रात्री १२ वाजता पूर्वेकडील लोकग्राम चौकीजवळ घडली. याप्रकरणी हल्ला करणाऱ्या तिघांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-------------------------------------------------
रक्तदान शिबिर
कल्याण: कोरोना समुपदेशन समितीच्या विद्यमाने १० मे ला सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पश्चिमेकडील शंकरराव चौकातील स्वामी नारायण हॉलमध्ये विनामूल्य अँटीबॉडी टेस्ट, प्लाझ्मा नोंदणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. जे पती-पत्नी रक्तदान करतील त्यांचा विशेष सन्मान केला जाईल, अशी माहिती अध्यक्ष अनिल काकडे यांनी दिली.
---------------------------------------------------