जितेंद्र आव्हाड यांच्यावर २४ तासात गुन्हा दाखल करा अन्यथा वर्तकनगर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून महाआरती करु!
By अजित मांडके | Published: January 4, 2024 10:58 AM2024-01-04T10:58:49+5:302024-01-04T10:59:55+5:30
पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येईल आणि वर्तकनगर पोलीस ठाण्यातच महाआरती करण्यात येईल, असा जाहीर इशारा दिला आहे.
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: प्रभू श्री राम हे मांसाहारी होते, असे अकलेचे तारे जितेंद्र आव्हाड यांनी तोडलेत पण ॠषी वाल्मिकी यांच्या रामायणात प्रभू श्री रामांनी मांसाहार केल्याचा कुठेही उल्लेख नाही. असे असताना सातत्याने जितेंद्र आव्हाड हे हिंदू देवदेवतांविरुद्ध, सनातन धर्माविरुद्ध, हिंदू धर्माविरुद्ध बोलतात आणि धर्माचा अपमान करतात तर दुसरीकडे बहुजन विरु वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रभू श्री रामाची महाआरती केली म्हणून गोमूत्र शिंपडतात. यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी, प्रभू श्री रामांविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल, जितेंद्र आव्हाड यांच्यावर येत्या २४ तासात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर वर्तकनगर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून पोलीस ठाण्यातच महाआरती करु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे.
शिर्डी येथील अधिवेशनामध्ये स्वतःला जे इतिहासाचे संशोधक म्हणतात त्या डाॅ जितेंद्र आव्हाड साहेब यांनी प्रभू श्री रामाचा अपमान करत, प्रभू श्री राम हे मांसाहारी होते, १४ वर्ष ज्यावेळी ते वनवासात होते तेव्हा अरण्यामध्ये शिकार करुन, मांसाहार करुन त्यांनी आपले वास्तव्य केले. प्रभू श्री रामांना बहुजन आणि सवर्ण यांच्यात वाटण्याचे कामदेखील त्यांनी केले. प्रभू श्री राम हे बहुजन होते म्हणून त्यांचा आदर्श ठेवून आम्ही मांसाहार करतो, अशाप्रकारचे अकलेचे तारे जितेंद्र आव्हाड यांनी तोडले आहेत. ॠषी वाल्मिकी यांनी जे रामायण लिहिले आहे ज्यात २४ हजार श्लोक लिहिले आहेत. ७ खंडामध्ये रामायण हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. त्याच्यामध्ये बालखंड आहे, अयोध्या खंड आहे, अरण्य खंड आहे, किष्किन्धा खंड आहे, सुंदर काण्ड आहे, युद्ध कांड आहे आणि शेवटच उत्तर खंड आहे. या सातही खंडांमध्ये २४ हजार श्लोक लिहिले आहेत. त्याच्यात कुठेही प्रभू श्री रामाने मांसाहार केला होता हे कुठेही आढळून येत नाही. वनवासात असताना देखील फळे, कंदमुळे खावून प्रभू श्री रामांनी वास्तव्य केले. अशी स्थिती असताना, कायम हिंदू देवदेवतांचा अपमान करायचा, हिंदू धर्माबद्दल अभद्र बोलायचे ही डाॅ जितेंद्र आव्हाड यांची संस्कृती आहे.
धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदू धर्माचा अपमान नाही, धर्मनिरपेक्षता म्हणजे मी हिंदू धर्माचा देखील तेवढाच सन्मान करीन, मी मुस्लिम धर्माचा देखील तेवढाच सन्मान करीन, मी ख्रिश्चन धर्माचा देखील तेवढाच सन्मान करीन आणि मी शिख धर्माचा, बौद्ध धर्माचा देखील तेवढाच सन्मान करीन हा धर्मनिरपेक्षवाद आहे. पण सातत्याने हिंदू देवतांबद्दल अभद्र बोलायचे, अपमान करायचा ही डाॅ जितेंद्र आव्हाड यांची सवय आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे, आमच्या हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळेच विरु वाघमारे व त्याचे सहकारी हे कुठलेही आंदोलन करण्यासाठी नव्हे तर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्री रामावरील वक्तव्याचा शांततापूर्णरित्या निषेध करण्यासाठी तिथे गेले होते. प्रत्येकाच्या हातामध्ये प्रभू श्री रामाचा फोटो होता आणि ते तिथे महाआरती करणार होते. पण दुर्देवाने मला पोलिसांचा देखील निषेध करावसा वाटतो की या लोकशाहीमध्ये महाआरती करण्यापासून पोलिसांनी त्यांना रोखले आणि वर्तकनगर पोलीस स्टेशनला घेऊन आले.
मी बहुजनांचा नेता आहे हे सांगायचे आणि बहुजन समाजातील विरु वाघमारे व त्यांचे बहुजन समाजातील सहकारी हे प्रभू श्री रामांची महाआरती करायला तिथे आले म्हणून जर गोमूत्र शिंपडत असाल तर याच्यापेक्षा हिंदू धर्माचा कुठला अपमान आहे ? सातत्याने सनातन धर्माविरुद्ध, हिंदू धर्माविरुद्ध बोलायचे, खोटे बोलायचे ही जितेंद्र आव्हाड यांची पद्धत आहे. यामुळे पुढच्या २४ तासात जितेंद्र आव्हाड यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर वर्तकनगर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येईल आणि वर्तकनगर पोलीस ठाण्यातच महाआरती करण्यात येईल, असा जाहीर इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.