मजूर दुर्घटना प्रकरणी रूनवाल बिल्डर अन् पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा- केदार दिघे
By अजित मांडके | Published: September 11, 2023 11:18 AM2023-09-11T11:18:57+5:302023-09-11T11:19:08+5:30
पालिका आयुक्त पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची फक्त नौटंकी करतात मात्र प्रत्यक्षात कारवाई करत नाहीत असा हल्लाबोल केदार दिघे यांनी केला आहे.
ठाणे : लिफ्ट कोसळून सहा मजूर मृत्युमुखी पडल्याप्रकरणी रुणवाल बिल्डर व संबंधित पालिका अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यदाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आधीच नगर विकास व नगररचना विभागाची बोंब असून सर्रास अनधिकृत बांधकाम सुरू आहेत. त्यात अधिकृत कामे करणाऱ्यांना सुद्धा नियमांचा विसर पडला की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.ज्या इमारतीत रुणवाल बिल्डरचे काम सुरू होते तिथे लिफ्ट कोसळून सहा कामगार ठार झाले ही गंभीर घटना असून याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे केदार दिघे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर संबंधित बिल्डर आणि ठाणे महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी ही केदार दिघे यांनी केली आहे. पालिका आयुक्त पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची फक्त नौटंकी करतात मात्र प्रत्यक्षात कारवाई करत नाहीत असा हल्लाबोल केदार दिघे यांनी केला आहे.