ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 06:38 IST2024-09-28T06:38:37+5:302024-09-28T06:38:52+5:30
आनंद परांजपे यांनी ठाण्याचे पोलिस आयुक्तांची भेट घेत ऋता आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
ठाणे : अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करणारा अतिरेकी ओसामा बिन लादेन भारताचे राष्ट्रपती व शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखा का होऊ शकला नाही? आईच्या उदरातून ओसामा दहशतवादी म्हणून जन्माला आला नाही. समाजाने व आजूबाजूच्या परिस्थितीने त्याला दहशतवादी बनवले. त्याचा शेवट अत्यंत क्रूर पद्धतीने झाला. त्यामुळे मुस्लिम समाजाने शिक्षित झाले पाहिजे, असे प्रतिपादन शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या ऋता आव्हाड यांनी केल्याचा व्हिडीओ सोशल व्हायरल झाला.
आव्हाडांकडून खंडन
अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन लादेन व कलाम यांची तुलना केल्याबद्दल ऋता आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
मुंब्रा कौसा येथे महिला व विद्यार्थिनींसाठी बुधवारी मार्गदर्शन मेळावा झाला. यावेळी ऋता यांनी लादेनचे आत्मचरित्र वाचण्याचा सल्ला दिला.
दरम्यान आजची पिढी अभ्यास करत नसल्याने त्यांना दिग्गजांची चरित्रे वाचण्यास सांगितले. कोणाची तुलना केली नाही, असे ऋता आव्हाड यांनी सांगितले.