बनावट ओळखपत्र घेऊन लस घेणाऱ्या २१ जणांवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:46 AM2021-08-18T04:46:52+5:302021-08-18T04:46:52+5:30

ठाणे : कौसा लसीकरण केंद्रावरील चोरीला गेलेले ४० लसीचे डोस एका खाजगी क्लिनिकमध्ये सापडल्यानंतर त्या केंद्राच्या प्रमुख डॉ. ...

File a case against 21 people who were vaccinated with fake identity cards | बनावट ओळखपत्र घेऊन लस घेणाऱ्या २१ जणांवर गुन्हे दाखल करा

बनावट ओळखपत्र घेऊन लस घेणाऱ्या २१ जणांवर गुन्हे दाखल करा

Next

ठाणे : कौसा लसीकरण केंद्रावरील चोरीला गेलेले ४० लसीचे डोस एका खाजगी क्लिनिकमध्ये सापडल्यानंतर त्या केंद्राच्या प्रमुख डॉ. शर्मिन धिंगा यांना निलंबित केले आहे. या मुद्यावरून मंगळवारी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनास चांगलेच धारेवर धरले. केवळ निलंबित न करता त्या डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करून ते खाजगी क्लिनिक सील करण्याची मागणी केली. तसेच दुसरीकडे बनावट ओळखपत्र घेऊन लस घेणाऱ्यांसह संबंधित ठेकेदाराविरोधात कारवाई करणार का?, असा सवालही केला असता महापौर नरेश म्हस्के यांनी बनावट ओळखपत्र घेऊन लस घेणाऱ्या त्या २१ जणांसह कौसातील त्या डॉक्टरांविरोधातही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता अभिनेत्री मीरा चोपडा या अडचणीत येण्याची शक्यता आहे.

कौसा येथील खाजगी क्लिनिकमध्ये महापालिकेच्या लस घेऊन नागरिकांना लस दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर तेथील कंत्राटी डॉक्टरला प्रशासनाने निलंबित केले. परंतु, हे प्रकरण एवढ्यावर थांबले नाही, मंगळवारी महासभेत भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी या मुद्यावरून कारवाईची मागणी केली. तसेच इतर नगरसेवकांनी देखील अशा डॉक्टरांवर गुन्हा दाखल करून त्या क्लिनिकला सील ठोकावे अशी मागणी लावून धरली. एवढा प्रकार घडल्यानंतरही प्रशासनाने त्या डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल न केल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले. याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केवळ त्यांच्या विरोधातच कारवाई का?, यापूर्वी देखील बनावट ओळखपत्र घेऊन लस घेणाऱ्या मीरा चोपडा यांच्यावर कारवाई केली का?, त्या संदर्भात नेमलेल्या समितीने अहवाल तयार करून कोणावर कारवाई केली. ठेकेदारावर कारवाई का झाली नाही, अशी विचारणा केली. त्यामुळे संबंधित ठेकेदारासह ज्यांनी लस घेतली आहे, त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी दोघांनी केली.

दरम्यान बनावट ओळखपत्र देऊन लस देण्यामध्ये कंत्राटदाराचा एक कर्मचारी दोषी असल्याने त्याला सेवेतून कमी केल्याचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैयजंती देवगीकर यांनी स्पष्ट केले. परंतु, गुन्हे दाखल का केले नाहीत, असा सवाल सदस्यांनी केला. अखेर महापौर नरेश म्हस्के यांनी बनावट ओळखपत्र देणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांसह लस घेणारे ते २१ जण आणि कौसा प्रकरणात दोषी आढळलेल्या त्या डॉक्टरवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, असे आदेश दिले. त्यामुळे आता त्या २१ जणांपैकी अभिनेत्री असलेल्या मीरा चोपडा यांच्यावर महापालिका आता गुन्हा दाखल करणार का?, असा सवाल उपस्थित झाला आहे.

Web Title: File a case against 21 people who were vaccinated with fake identity cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.