झाडे-वीज खांबांवर केबल टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:45 AM2021-09-21T04:45:45+5:302021-09-21T04:45:45+5:30
ठाणे : शहरातील झाडे आणि वीज खांबांवर असलेल्या केबलवर तात्काळ कारवाईचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी सोमवारी झालेल्या सर्वसाधारण ...
ठाणे : शहरातील झाडे आणि वीज खांबांवर असलेल्या केबलवर तात्काळ कारवाईचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दिले. ज्या ठिकाणी अनधिकृतपणे केबल टाकल्या आहेत त्या संबंधितांवर गुन्हे दाखल करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी विद्युत विभागाला दिले.
सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सभागृह नेते अशोक वैती यांनी हा प्रश्न उपस्थित केला. ठाणे शहरात विविध कंपन्यांनी केबल टाकलेल्या आहेत. मात्र, त्या झाडे आणि विद्युत पोलवर असून नागरिकांना यामुळे जीवाचा धोका निर्माण होऊ शकतो,अशी भीती वैती यांनी व्यक्त केली. यापूर्वीदेखील दुर्घटना होऊन नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. आपण आर्थिक मदत केली तरी एकदा माणसाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न त्यांनी केला. यावर विधिविभागाचे प्रमुख ॲड. मकरंद काळे यांनी एखाद्या कंपनीने महापालिकेची परवानगी न घेता केबल टाकली असेल तर त्या दुर्घटनेची जबाबदारी संबंधित कंपनीची असेल असे उत्तर दिले. मात्र यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही काहीच कारवाई केली नसून, महापालिकेच्या स्तरावर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी वैतींनी केली.
यावर विद्युत विभागाचे उपनगर अभियंता विनोद गुप्ता यांनी झाडांवरील तसेच विद्युत पोलवर ज्या केबल टाकल्या आहेत त्या काढण्यासाठी नोटीस वर्तमानपत्रात जाहीर केली असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. मात्र, वर्तमानपत्रात नोटीस न देता थेट तत्संबंधित कंपन्यांना नोटीस देण्याची मागणी नगरसेवक विकास रेपाळे यांनी केली. यावर महापौरांनी अशा सर्व केबलवर तात्काळ कारवाई करून अनधिकृत केबल टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.