ठाणे महापालिका आयुक्तांविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 05:57 AM2018-03-06T05:57:49+5:302018-03-06T05:57:49+5:30
ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप करणारी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने संबंधित मुलीचा जबाब नोंदविण्याचे निर्देश पोलिसांना सोमवारी दिले.
मुंबई - ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप करणारी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने संबंधित मुलीचा जबाब नोंदविण्याचे निर्देश पोलिसांना सोमवारी दिले.
संजीव जयस्वाल रात्री उशिरापर्यंत आपल्याकडून बॉडी मसाज करून घेत, असा आरोप एका १५ वर्षाच्या मुलीने केला आहे. याची व्हिडीओ क्लीप सगळीकडे व्हायरल झाली. त्यानंतर जयस्वाल यांनी सूडबुद्धीने मुलगी राहत असलेली झोपडी तोडली, असा आरोप तिच्या आईने केला आहे.
एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने जयस्वाल यांच्यावर पॉक्सोअंतर्गत कारवाई करण्यात यावे, अशी विनंती ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांनी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. आर. एम. सावंत व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे होती. उच्च न्यायालयाने हा आरोप गंभीर स्वरुपाचे आहे, असे म्हणत एसीपी पद्मजा चव्हाण यांना संबंधित मुलीचा जबाब नोंदविण्याचे निर्देश दिले. याचिकेनुसार, मुलीच्या आईने याबाबत मानपाडा पोलीस ठाणे व पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. मात्र, कोणीही या तक्रारीची दखल घेतली नाही. अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या महिला पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी विनंतीही याचिकाकर्त्यांनी केली आहे.