‘फाइल चोरी’ प्रकरणाला फुटले पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 04:46 AM2018-05-14T04:46:35+5:302018-05-14T04:46:35+5:30
महापालिकेच्या बांधकाम विभागातील ‘फाइल चोरी’ प्रकरणी गुन्हा दाखल झालेले भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना न्यायालयाने १६ मेपर्यंत
उल्हासनगर : महापालिकेच्या बांधकाम विभागातील ‘फाइल चोरी’ प्रकरणी गुन्हा दाखल झालेले भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना न्यायालयाने १६ मेपर्यंत
पोलीस कोठडी दिली असून, त्यांचे घर आणि आॅफिसची झाडाझडती पोलीस घेत आहेत. त्यात ३०पेक्षा अधिक फाइल मिळाल्याची चर्चा रंगली असली, तरी त्याला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. यापूर्वी फाइल चोरी प्रकरणात ज्यांची ज्यांची नावे पुढे आली होती, ते अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे या कारवाईमुळे धाबे दणाणले आहेत.
उल्हासनगर पालिकेच्या बांधकाम विभागातील फाइल चोरीचा व्हिडीओच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पक्षाची अब्रू गेली. त्यानंतर पालिका आयुक्त गणेश पाटील यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश शहर अभियंता महेश शीतलानी यांना दिले. त्यानुसार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन रामचंदानी यांना अटक झाली. न्यायालयाने त्यांना १६ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी रामचंदानी यांच्या घर व आॅफिसची झडती घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार इतर फाइलचा शोध सुरू आहे. या झडतीत ३० पेक्षा जास्त फायली सापडल्याची माहिती सोशल मीडियावर फिरत आहे. फायलींची चोरी उघड झाल्याने पोलीसही हैराण झाले असून, आता अन्य फायलींचा शोधही सुरू असल्याची माहिती गोयल यांनी दिली.
ही फाइल चोरी उघड झाल्यावर महापालिकेतील अन्य चोरीच्या घटनांची खमंग चर्चा सुरू झाली. यापूर्वी फायली चोरण्याचे
आणि त्यातून गुन्हे लपविण्याचे प्रकार झाले. त्यांच्यावरही रामचंदानी यांच्याप्रमाणे गुन्हे दाखल करा, अशी मागणी मनसे कामगार संघटनेचे दिलीप थोरात यांनी केली. त्यांनी सोमवारी सकाळी आंदोलनाचा इशारा दिला आहे.