केडीएमसीच्या लाचखोर अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 12:26 AM2020-01-02T00:26:04+5:302020-01-02T00:26:12+5:30
अनधिकृत बांधकाम प्रकरण: कारवाई करण्यासाठी मागितली होती लाच
कल्याण : स्वमालकीच्या जागेवर केलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांची लाच मागणाºया डोंबिवलीतील ह प्रभाग क्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे आणि पर्यवेक्षक गजानन आगवणे या दोघांविरोधात विष्णूनगर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. केडीएमसी अधिकारी आणि पर्यवेक्षकाने लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने वर्षाची सुरुवातच पालिकेतील भ्रष्टाचाराच्या वृत्ताने झाली आहे.
व्यवसायाने इस्टेट एजंट असलेल्या तक्रारदाराची कुंभारखाणपाडा परिसरात जमीन आहे. या जमिनीवर करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी तक्रारदाराने कंखरे याच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर, या कारवाईसाठी कंखरे आणि आगवणे या दोघांनी ४ डिसेंबरच्या दुपारी ह प्रभाग कार्यालयात दोन लाखांची मागणी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
केडीएमसी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याची ओरड लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. दुसरीकडे अधिकारी कागदी घोडे नाचवत असल्याचे दिसून येते. या बांधकामांवर कारवाई न करण्यासाठी बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कचाट्यात सापडले आहेत.
केडीएमसीतील भ्रष्टाचाराबाबत सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी सरकारदरबारी वेळोवेळी तक्रारी केल्या. मात्र, त्यांच्यावर ठोस कारवाई झाली नाही. यापूर्वीही पालिकेतील अनेक अधिकारी, कर्मचारी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालण्यासाठी लाच स्वीकारताना पकडले गेले असून यात अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांचादेखील समावेश आहे. मात्र, तरीही केडीएमसीला लागलेली भ्रष्टाचाराची कीड थांबता थांबत नाही.
केडीएमसीला लागलेली भ्रष्टाचाराची कीड दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये केवळ कर्मचारीच नव्हे तर येथील वरिष्ठ दर्जाचे अधिकारीही सामील असल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. याबाबत शासनदरबारी तक्रारी करुनही ठोस कारवाई झालेली नाही.
केडीएमसीतील लाचखोरांचा इतिहास
वर्ष अधिकारी लाचेची रक्कम
नोव्हेंबर ११९७ कार्यकारी अभियंता सुनील जोशी ५ लाख
नोव्हेंबर १९९७ उपअभियंता जयवंत म्हात्रे ६० हजार
जानेवारी १९९९ कनिष्ठ अभियंता धोंडिबा कातकर १२ हजार
एप्रिल २००० उपायुक्त सुरेश पवार २ लाख ५० हजार
फेब्रुवारी २०१४ प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे ३ लाख
एप्रिल २०१४ उपअभियंता दत्तात्रेय मस्तूद ४ लाख
नोव्हेंबर २०१६ सहायक आयुक्त गणेश बोराडे १ लाख ५० हजार
नोव्हेंबर २०१६ उपअभियंता प्रकाश चौधरी १० हजार
जुलै २०१७ प्रभागक्षेत्र अधिकारी स्वाती गरुड २५ हजार
जून २०१८ संजय घरत ८ लाख