उल्हासनगरातील दुर्घटनाग्रस्त साईशक्ती इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल; स्लॅब पडून ७ जणांचा झाला होता मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 04:28 PM2021-06-19T16:28:04+5:302021-06-19T16:33:43+5:30
गेल्या महिन्यात साईशक्ती इमारतीचा स्लॅब पडून ७ जणांचा मृत्यू झाला होता.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : गेल्या महिन्यात साईशक्ती इमारतीचा स्लॅब पडून ७ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या तक्रारीवरून बांधकाम व्यावसायिक बलराम मुलचंदानी व भागीदार बी ए जी इंटरप्राईज यांच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-१ परिसरातील बडोदा बँक समोर बलराम मुलचंदानी व बीएजी इंटरप्राईजेस यांनी सन १९९४ ते ९६ दरम्यान विना परवाना अनधिकृतपणे पाच मजल्याची साईशक्ती इमारत बांधून प्लॉटची विक्री केली. गेल्या महिन्यात पाच मजल्याच्या साईशक्ती इमारतीचा स्लॅब एकावर एक पडल्याने ७ जणांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी मोहिनी पॅलेस इमारतीचा स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकारने शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर येऊन दुर्घटनाग्रस्त झालेल्या साईशक्ती व मोहिनी पॅलेस इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वस्तरातून झाली. मोहिनी पॅलेस इमारतीच्या बिल्डरावर गुन्हा दाखल झाल्यानंतर, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी शुक्रवारी उल्हासनगर पोलीस ठाण्यात इमारतीचे विकासक बलराम मुलचंदानी व बीएजी इंटरप्राईजेस यांच्या विरोधात तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
शहरात सन १९९२ ते ९८ दरम्यान रेतीवर बंदी असतांना, उलावा रेती व दगड्याच्या बारीक चुऱ्यातून बहुतांश इमारती बांधण्यात आल्या. अश्या इमारतीचे स्लॅब पडून अनेक जणांचा बळी जात असल्याचा आरोप होत आहे. गेल्या महिन्यात मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमारतीचे स्लॅब कोसळून १२ जणांचा बळी गेल्याने, शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले.
महापालिकाने सन १९९४ ते ९८ दरम्यानच्या इमारतीचे सर्वेक्षण करून ५०५ इमारतीला स्ट्रॅक्टरल ऑडिट करण्याच्या नोटिसा दिल्या. त्यापूर्वी १० वर्ष जुन्या इमारतींना नोटिसा देऊन स्ट्रॅक्टरल ऑडीटची मागणी महापालिकेने केली. यापूर्वीही इमारतीचे स्लॅब पडून मृत्युमुखी पडलेल्या इमारत बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. तसेच दुर्घटनाग्रस्त व धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीची मागणी होत आहे.