लग्न सोहळ्याप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:30 AM2021-07-17T04:30:22+5:302021-07-17T04:30:22+5:30
मीरा रोड : कोरोना निर्बंधांचे सर्रास उल्लंघन करून भाईंदरच्या एका खासगी सभागृहात दोन दिवस चाललेल्या लग्न सोहळा, नाचगाण्या प्रकरणी ...
मीरा रोड : कोरोना निर्बंधांचे सर्रास उल्लंघन करून भाईंदरच्या एका खासगी सभागृहात दोन दिवस चाललेल्या लग्न सोहळा, नाचगाण्या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी आयोजक व हॉलमालक आदींवर गुन्हा दाखल केला आहे. या कार्यक्रमास आजी-माजी आमदार, नगरसेवक, राजकारण्यांनी हजेरी लावली असताना त्यांनीही या उल्लंघनाकडे कानाडोळा केला.
रायपूर धनलक्ष्मी जनसेवा ट्रस्टने ११ जोडप्यांचे विवाह सोहळ्याचे आयोजन भाईंदर पश्चिमेस उड्डाणपुलाजवळ असणाऱ्या व्यंकटेश हॉलमध्ये बुधवार व गुरुवार असे दोन दिवस केले होते. या कार्यक्रमासाठी वर्गणी, देणगी देण्याचे जाहीर आवाहन करत ती गोळा केली होती. या साेहळ्यात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. बहुतेकांनी मास्कही घातले नव्हते. गाण्यांवर अनेकांनी नाच केला. त्यातच उल्लंघन करून सुरू असलेल्या या समारंभास आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहतांसह अनेक नगरसेवक, राजकारणी यांनी हजेरी लावली. दरम्यान, गुरुवारी भाईंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुगुट पाटील यांना माहिती मिळताच पोलीस कर्मचारी रवींद्र वाणी यांना घटनास्थळी पाहणी केली. काेराेनाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाणी यांच्या फिर्यादीवरून कविता कल्पेश सरय्या, धर्मेंद्र लक्ष्मीचंद शर्मा, संजय शामराव दळवी आणि कमलाकर रमाकांत कांदळगावकर यांच्यासह लग्नासाठी इतर १२५ ते १५० लोकांवर बेकायदा जमाव बनवून शासनाच्या नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.