ईपीएफ न भरल्याने विविध कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 05:45 AM2018-10-06T05:45:25+5:302018-10-06T05:46:03+5:30
भविष्य निर्वाह निधी कार्यालयाची कारवाई
ठाणे : कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम परस्पर हडप करणाऱ्या कंपन्यांवर ठाण्याच्या भविष्य निधी कार्यालयामार्फतफौजदारी कारवाई करण्यात आली आहे. कायद्यानुसार प्रत्येक कंपन्यांनी दरमहिन्याच्या १५ तारखेच्या आत कामगाराच्या वेतनातून १२ टक्के रक्कम आणि तेवढीच रक्कम कंपनीच्या निधीतून संकलित करून ती पीएफ कार्यालयाकडे जमा करणे अभिप्रेत आहे. परंतु, काही कंपन्या कामगारांच्या वेतनातून कापलेल्या रकमेचा परस्पर अपहार करतात, अशी बाब समोर आली होती.
त्यांना चाप लावण्यासाठी केंद्रीय स्तरावर यंत्रणा कार्यान्वित असून त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे विविध पोलीस ठाण्यांत काही कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मेसर्स श्री समर्थ कन्स्ट्रक्शन ठाणे, मेसर्स दीपा कॉटन भिवंडी आणि एम.व्ही. वाघाडकर अॅण्ड सन्स ज्वेलर्स प्रा.लि. डोंबिवली अशा काही कंपन्यांचा त्यात समावेश आहे. ही कारवाई सहायक भविष्य निधी आयुक्त उषा शोदे आणि दुर्गेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवर्तन अधिकारी अरु ण दयाल, रौफ शेख व प्रेक्षा उरणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करण्यात आली आहे.
दरमहिन्याच्या १५ तारखेपर्यंत पैसे भरा
सर्व डिफॉल्ट कंपन्यावर ही कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत भविष्य निधीचे पैसे जमा करून दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई टाळण्याचे आवाहन ठाणे भविष्य निधी क्षेत्रीय आयुक्त सुधीर गणवीर यांनी सर्व कंपन्या तसेच आस्थापनांना आवाहन केले आहे.