कंपाऊंडीग चार्जेस भरण्यासाठी शहरातील हॉटेल व्यावसायिकांना जून पर्यंत दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 04:28 PM2018-04-02T16:28:41+5:302018-04-02T16:28:41+5:30
कंपाऊंडीग चार्जेस न भरल्याने ठाण्यातील ४६० हॉटेल सील करण्याची कारवाई पालिका करणार होती. परंतु पालिकेने पुन्हा हॉटेल व्यावसायिकांच्या दिशेने झुकते माप देत, त्यांना जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
ठाणे - अग्निशमन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी प्रशासकीय दंडात्मक शुक्ल भरल्यानंतर हॉटेल चालकांना व्यवसाय करता येईल अशी आशा होती. परंतु कंपाऊंडींग चार्जेस भरले नाही तर ३१ मार्चनंतर हॉटेल सील केले जातील अशी नोटीस अग्निशमन दलाने बजावण्यास सुरूवात होती. अखेर यावर आयुक्तांनीच तोडगा काढला असून हॉटेल व्यावसायिकांना हे चार्जेस भरण्यासाठी जून पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल व्यावयासिकांना दिलासा मिळाला आहे.
मागील काही महिन्यापासून ठाण्यात अग्निसुरक्षेच्या मुद्यावर ठाणे अग्निशमन दलाने शहरातील ४६० हॉटेल आणि बार व्यावसायीकांना नोटीस बजावली होती. अग्निसुरक्षेची व्यवस्था भक्कम करण्यासोबतच ५ ते २० लाख रु पयांपर्यंतच्या प्रशासकीय दंडात्मक शुल्काचा भार या व्यावसायीकांवर टाकण्यात आला होता. हा दंड भरणे अशक्य असल्याच्या मुद्यावर हॉटेल व्यावसायीकांनी बंद पुकारला होता. त्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मध्यस्थी केल्यानंतर अग्निशमन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी प्रशासकीय शुक्लाच्या रकमेत घसघशीत सुट देणअयात आली. ५ ते २० लाखांपर्यंतचे प्रशासकीय दंडात्मक शुक्ल २५ हजार ते चार लाख रु पयांपर्यंत कमी करण्यात आले. हे शुक्ल भरून तसेच अग्निसुरक्षेची यंत्रणा भक्कम करून हॉटेल व्यावसायीकांनी अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे.
दरम्यान, ३१ मार्च, २०१८ पर्यंतच हे प्रमाणपत्र देण्यात आल्याने व्यावसायीकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यातच आता हॉटेल आणि बारचे बांधकाम शहर विकास विभागाकडे कंपाऊंड शुल्क भरून अधिकृत करून घ्या अन्यथा ३१ मार्च नंतर अस्थापनांना सील ठोकले जाईल असा फतवा अग्निशमन विभागाने काढला होता. कंपाऊंड शुल्क हे शहर विकास विभागाशी संबंधित असताना अग्निशमन दल त्याबाबतची नोटीस का देत आहे असा सवाल व्यावसायीकांकडून उपस्थित केला जात होते. तसेच कंपाऊंडींग शुल्काची रक्कम प्रचंड असल्याने ती भरणे व्यावसायीकांना शक्य नाही. तसेच, अनेक व्यवसाय हे भाडेतत्वावरील जागांवर असून मुळ मालक हे शुक्ल भरण्यास तयार नसल्याने व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे या व्यावसायीकांचे म्हणणे झाले होते.
त्यानंतर ३१ मार्च पर्यंत सुमारे १० जणांनीच ही रक्कम भरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता शहरातील उर्वरीत हॉटेल सील केले जातील अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु पालिका आयुक्तांनी पुन्हा या हॉटेल व्यावसायिकांना काहीसा दिलासा दिला आहे. कंपाऊंडींग चार्जेस भरण्यासाठी आता जून पर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
वारंवार मुदत वाढ कशासाठी
पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ३१ मार्च पर्यंत शहरातील बार आणि हॉटेल्स व्यासायिकांना कपाऊंडीग फी भरण्याची मुदत दिली होती. त्यानंतर हे चार्जेस न भरणाऱ्या बार व हॉटेल्सला सील करण्याची घोषणा केली होती. मात्र पुन्हा एकदा हॉटेल्स व्यासायिकांना ही फी भरण्याची मुदत देण्यात आली असून ती मुदत आता थेट जूनपर्यंत देण्यात आली आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही हॉटेल्स व्यावसायिक कपाऊंडींग चार्जेस भरत नसताना अजूनही हॉटेल्स व्यावसायिकांना मुदतवाढ का दिली जाते याबाबत मात्र गूढ निर्माण झाले आहे .