खड्डे बुजवा; अन्यथा विसर्जन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:56 AM2019-08-29T00:56:56+5:302019-08-29T00:57:02+5:30
अरविंद मोरे यांचा इशारा : आग्रा रोडवरून शिवसेनेला दिला घरचा आहेर
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसी हद्दीतील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. कल्याण-आग्रा रोड हा राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात आहे. महामंडळाने गणेशोत्सवाआधी बुजवले नाहीत, तर गणेश विसर्जन करणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे कल्याण विधानसभा संघटक अरविंद मोरे यांनी दिला आहे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना मोरे यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.
काही दिवसांपूर्वी मोरे यांनी चिखलफेक आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना नोटीस बजावल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले. मोरे हे शिवसमर्थ सेवा या गणेशोत्सव मंडळाचे सर्वेसर्वा आहेत. यंदा त्यांनी १० फुटी गणेशमूर्तीची स्थापना करण्याचे जाहीर केले आहे. भाजपने काश्मीरमधील ३७० कलम रद्द केले. त्यावर आधारित त्यांनी देखावा उभारण्याचे काम हाती घेतले आहे. गणेश विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाणार आहे. आग्रा रोडवर खाडीच्या विसर्जनस्थळाकडे जाण्यासाठी असलेल्या मार्गात खड्डे असल्यास गणेशमूर्तीचे विसर्जन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
गणेशोत्सवासाठी केडीएमसी सज्ज
गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज आहे. दीड दिवसाच्या गणपतीसाठी ‘विसर्जन आपल्या दारी’ ही संकल्पना महापालिकेने मांडली आहे. प्रत्येक प्रभागात महापालिकेचा एक ट्रक असेल. त्यात असलेल्या टाकीतील स्वच्छ पाण्यात मूर्तीचे विसर्जन करता येणार आहे. त्यामुळे उत्सवाचे पावित्र्य जपले जाईल. तसेच पर्यावरणाचे संतुलनही बिघडणार नाही, असे आयुक्त गोविंद बोडके यांनी सांगितले. विसर्जन मिरवणुकीच्या महत्त्वाच्या ४२ ठिकाणी सुरक्षिततेसाठी २२३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. २९०० हॅलोजन, ६२ लायटिंग टॉवर बसवले आहेत. वीजपुरवठा निरंतर सुरू ठेवण्यासाठी ६७ जनरेटरची सोय केली आहे. कल्याण शहरात ३० विसर्जनस्थळे आहेत. त्यापैकी विठ्ठलवाडी, जरीमरी १०० फुटी रोड, मुंबई विद्यापीठ कल्याण उपकेंद्र येथे कृत्रिम विसर्जन तलाव तयार केले आहेत. डोंबिवलीत ४० विसर्जनस्थळे आहेत. त्यापैकी पूर्वेला पंचायत बावडी, नेहरू मैदान, अयोध्यानगरी रोड, शिवम हॉस्पिटल, टिळकमंदिर शाळा, आयरे रोड, कस्तुरी प्लाझा, प्रगती कॉलेज, मिलापनगर, आजदेगाव, रिजन्सी इस्टेट तर पश्चिमेला आनंदनगर गार्डन, भागशाळा मैदान येथे कृत्रिम तलाव तयार केले आहेत. दरम्यान गणेशोत्सवापूर्र्वी खड्डे बुजवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
खड्डे दाखवल्यास राजीनामा देण्याचे आव्हान
शिवसेनेचे नगरसेवक मोहन उगले यांनी त्यांच्या प्रभागातील एकाही रस्त्यावर खड्डा पडलेला नाही. प्रभागातील रस्त्यावर खड्डा दाखवा. खड्डा पडलेला असेल, तर नगरसेवकपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांचा प्रभाग हा खड्डेमुक्त असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बाप्पांच्या आगमनापूर्वी डागडुजी करा
चिकणघर : बाप्पांच्या आगमनाला काही दिवस बाकी असतानाही रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. त्यामुळे ते तातडीने बुजवावेत, अशी मागणी येथील शिवसेना शाखाप्रमुख संतोष भोईर यांनी केडीएमसी आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. येथील जीवनसंध्या सोसायटी ते छत्री बंगला आणि छत्री बंगला ते रामबाग डॉन बास्को शाळेपर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आगमनाच्या मिरवणुकीत अडथळे येण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी रस्त्यांची डागडुजी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.