रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:45 AM2021-08-14T04:45:51+5:302021-08-14T04:45:51+5:30
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत विविध ठिकाणी खड्ड्यांची संख्या वाढत आहे. मात्र पावसाची उघडीप असतानाही, खड्डे बुजविण्याच्या ...
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत विविध ठिकाणी खड्ड्यांची संख्या वाढत आहे. मात्र पावसाची उघडीप असतानाही, खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनावर आगपाखड करीत गणेशोत्सवाच्या आत खड्डे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बुजविण्याचे आदेश शुक्रवारी दिले.
पावसाळा सुरू झाला की रस्त्यांवर खड्डे पडणे हे नित्याचेच झाले आहे. यंदादेखील पावसाळा सुरू झाल्यानंतर रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. शहरात सध्याच्या घडीला २ हजारांहून अधिक खड्डे आहेत. पावसामुळे खड्डे बुजविण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे कारण देत पालिकेकडून खड्डे बुजविण्याची मोहीम धिम्या गतीने सुरू आहे. ठाणे महापालिका हद्दीत सर्वच विभागातील रस्त्यांवर खड्डे पडले असून, नागरिकांकडून खड्डे बुजविण्याबाबत मागणी होत असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. महापालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यांवर जून महिन्यापासून खड्डे पडलेले आहेत, ही वस्तुस्थिती असल्याचेही महापौरांनी मान्य केले. अनेक ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. परंतु तरीसुद्धा काही ठिकाणी खड्डे बुजविण्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत असल्याचे त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. श्रीगणेशाचे आगमन व विसर्जनादरम्यान खड्ड्यांचा त्रास होऊ नये, यासाठी खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत, असे आदेश त्यांनी दिले आहेत.