‘पंचायत समितीतील रिक्त पदे भरा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:53 AM2021-02-20T05:53:34+5:302021-02-20T05:53:34+5:30
मुरबाड : मुरबाड पंचायत समितीत रिक्त असलेली अधिकारी, कर्मचाऱ्यांची आणि विशेषकरुन ग्रामसेवकांची रिक्त पदे भरल्यास नागरिकांची प्रलंबित कामे तातडीने ...
मुरबाड : मुरबाड पंचायत समितीत रिक्त असलेली अधिकारी, कर्मचाऱ्यांची आणि विशेषकरुन ग्रामसेवकांची रिक्त पदे भरल्यास नागरिकांची प्रलंबित कामे तातडीने करता येतील, अशी मागणी मुरबाड पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांडगे यांच्याकडे केली आहे.
सरकारने वंचित घटकांना निवारा देण्यासाठी सुरु केलेल्या महाआवास अभियानचे ‘संकल्प घरकुल उभारणी’ कार्यक्रमाचे उद्घाटन दांडगे यांच्या हस्ते मुरबाड पंचायत समितीच्या आवारात करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत, उल्हास बांगर, समाजकल्याण सभापती नंदा उघडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक छाया शिसोदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंगे, गटविकास अधिकारी रमेश अवचार आदी उपस्थित होते. सरकारच्या अनेक योजनांचा निधी पंचायत समितीकडे असला तरी त्याच्या अंमलबजावणीसाठी पुरेसा कर्मचारीवर्ग नसल्यामुळे नागरिकांची प्रलंबित कामे वेळेत होत नाहीत.
मुरबाड तालुक्याचा बहुतांश भाग हा ग्रामीण भागात येत असल्याने तालुक्यात ग्रामसेवकांची ५० पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकेका ग्रामसेवकाला तीन तीन पंचायती देऊन कारभार चालविला जात आहे. नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याने प्रशासनासमोर तक्रारींचा पाऊस पडतो. यासाठी रिक्त पदे भरण्याची मागणी धुमाळ यांनी केली आहे.