पालिकेतील ९६४ रिक्त पदे कंत्राटावर भरण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:22 AM2019-02-10T00:22:57+5:302019-02-10T00:23:06+5:30

मीरा-भाईंदर महापालिकेत मंजूर पदांनुसार सध्या ९६४ पदे रिक्त असल्याची आरटीआय कार्यकर्ते कृष्णा गुप्ता यांनी माहिती अधिकारातून उघड केली आहे.

Filling of 964 vacancies in the Municipal Corporation | पालिकेतील ९६४ रिक्त पदे कंत्राटावर भरण्याचा घाट

पालिकेतील ९६४ रिक्त पदे कंत्राटावर भरण्याचा घाट

Next

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेत मंजूर पदांनुसार सध्या ९६४ पदे रिक्त असल्याची आरटीआय कार्यकर्ते कृष्णा गुप्ता यांनी माहिती अधिकारातून उघड केली आहे. परंतु, ती पदे कंत्राट पद्धतीवरच भरण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जात आहे. ठोक मानधनासह कंत्राटावर कार्यरत कर्मचारी व कामगारांमध्ये नाराजी पसरली असून रिक्त पदांवर त्यांनाच प्राधान्याने सेवेत सामावून घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पालिकेत एकीकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने कामे वेळेवर होत नसल्याचा कांगावा प्रशासनाकडून केला जातो. ‘ड’ वर्गातील पालिकेला राज्य सरकारने विविध संवर्गातील पदे भरण्यास अनुमती दिली आहे. प्रथम वर्गात एकूण ८० पदे मंजूर असून त्यापैकी ३७ पदे अद्याप रिक्त ठेवली आहेत. यातील बहुतांश वैद्यकीय अधिकाºयांची ठोक मानधनावर नियुक्ती केली जाते. त्यांना सरकारी नियमानुसार वेतन व लाभ दिले जातात. इतर काही महत्त्वाची पदे पालिका आस्थापनेवरील अधिकाºयांच्या प्रभारी नियुक्तीने भरली जातात. वर्ग-२ साठी एकूण ५१ पदे मंजूर असून त्यातील २८ पदे अद्यापही रिक्त आहेत. वर्ग-३ साठी एकूण ७३० पदे मंजूर असताना त्यातील २५४ पदे रिक्त ठेवली आहेत. वर्ग-४ मधील एक हजार ५८१ पदांना मंजुरी असून त्यापैकी ६४५ पदे रिक्त ठेवली आहेत.
पालिकेत संगणकचालकांची वानवा असतानाही ठोक मानधनावरील ७० संगणकचालक व लघुलेखक आपली सेवा चोखपणे बजावत आहेत. अशातच, पालिकेने २००० मध्ये सफाई कामगारांची कंत्राटी पद्धतीवर भरती केली होती. त्यावेळी राज्य सरकारने एक हजार १८० पदांना मंजुरी दिली होती. त्यापैकी पालिकेकडून केवळ ७०९ कामगारांनाच सेवेत सामावले गेले.
भरलेल्या पदांवर काम करणाºयांपैकी काही कामगार मृत, तर काही निवृत्त झाले असून त्यांच्या वारसदारांनाही प्रशासनाने ताटकळत ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. पालिकेकडून सफाई कामगारांना सध्या कंत्राटी पद्धतीवर नियुक्त केले जात असून त्यातही राज्य सरकारच्या लाड समितीने केलेल्या शिफारशीनुसार अद्यापही सुमारे ८०० कामगार कमी पडत आहेत.
पालिकेने रिक्त पदे भरण्यासाठी सतत कंत्राटी पद्धतीचा अवलंब केला असून त्यात कंत्राटदाराचेच भले करण्याचा प्रयत्न चालवल्याचा आरोप कर्मचारी व कामगार संघटनांकडून केला जात आहे.

वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सफाई कामगारांची संख्या पुरेशी नाही. त्यांच्या नियुक्तीबाबत पाठपुरावा सुरू असून कंत्राटावर काम करणाºया कामगारांना अनुभवानुसार प्राधान्याने रिक्त पदांवर सामावून घ्यावे, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे.
- विवेक पंडित, संस्थापक, श्रमजीवी कामगार संघटना
पालिकेकडून कंत्राटी कामगारांना स्थायी कामगारांप्रमाणेच लाभ, तर किमान वेतनाप्रमाणेच पगार दिला जातो. त्यामुळे रिक्त पदे कंत्राटावर न भरता ती थेट पालिकेकडूनच भरावीत, तसे निर्देश केंद्र व राज्य सरकार कामगार आयोगाकडून प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच संघटनेद्वारे सतत पाठपुरावा सुरू आहे.
- गोविंद परब, पालिका युनिट अध्यक्ष, मीरा-भार्इंदर कामगारसेना

रिक्त पदांवर प्राधान्याने कंत्राटी तसेच ठोक मानधनावरील कर्मचारी व कामगारांना सामावून घेण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असला, तरी ठोक मानधनावरील संगणकचालकांचा विषय आमदार नरेंद्र मेहता यांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच मांडण्यात आला आहे. - प्रभाकर गायकवाड,
सरचिटणीस, श्रमिक जनरल कामगार संघटना

Web Title: Filling of 964 vacancies in the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.